India vs England 5th Test : भारत-इंग्लंड यांच्यातल्या कसोटी मालिकेतील पाचवा व शेवटचा सामना उद्यापासून धर्मशाला येथे सुरू होत आहे. भारतीय संघाने मालिकेत ३-१ अशी विजयी आघाडी घेतली आहे. या कसोटीतून जसप्रीत बुमराहने पुनरागमन होणार आहे. वर्कलोड लक्षात घेता चौथ्या कसोटीत त्याला विश्रांती दिली गेली होती आणि तो आता धर्मशाला कसोटीसाठी सज्ज झाला आहे. जसप्रीतने या कसोटी मालिकेत ६ इनिंग्जमध्ये १७ विकेट्स घेतल्या आहेत आणि इंग्लंडचा फिरकीपटू टॉम हार्टली ( २०) आघाडीवर आहे. बुमराहला पाचव्या कसोटीत दमदार कामगिरी करून या यादीत अव्वल स्थानावर जाण्याची संधी आहे आणि अशात त्याच्यासमोर वेगळं आव्हान उभं राहिलं आहे.
आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या क्रमवारीत भारतीय गोलंदाज ८६७ रेटींग गुणांसह अव्वल स्थानावर आहे. पण, त्याच्या अव्वल स्थानाला ऑस्ट्रेलियाच्या जोश हेझलवूड व नॅथन लायन यांच्याकडून आव्हान मिळण्याची बातमी आयसीसीने पोस्ट केली आहे. न्यूझीलंडविरुद्धच्या कसोटी मालिकेत या दोघांनी मिळून १४ विकेट्स घेतल्या होत्या. त्यामुळे आयसीसी क्रमवारीत त्यांनी अनुक्रमे चौथ्या व सहाव्या क्रमांकावर कूच केली आहे. हेझलवूड ( ८२२ गुण) व लायन ( ७९७) हे अव्वल स्थानाच्या दिशेने कूच करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा कर्णधार पॅट कमिन्स ( ८११) पाचव्या स्थानी घसरला आहे, तर मिचेल मार्श १२व्या क्रमांकावर पोहोचला आहे. भारताचा रवींद्र जडेजा ( ८४६ ) व आफ्रिकेचा कागिसो रबाडा ( ८३४) अनुक्रमे दुसऱ्या व तिसऱ्या क्रमांकावर आहे.
फलंदाजांच्या क्रमवारीतही ऑस्ट्रेलियाच्या कॅमेरून ग्रीन यानेही नाबाद १७४ धावांच्या खेळीच्या जोरावर २२ स्थान वर झेप घेताना २३वा क्रमांक पटकावला. केन विलियम्सन वेलिंग्टन कसोटीत शून्यावर बाद झाला असला तरी त्याने अव्वल स्थान टिकवले आहे, परंतु स्टीव्ह स्मिथचे रेटिंग गुण २०१४ नंतर प्रथमच ८०० च्या खाली आले आहेत आणि तो तिसऱ्या क्रमांकावर सरकला आहे. ग्लेन फिलिप्स व राचीन रवींद्र यांच्या क्रमवारीत सुधारणा झाली आहे.