ऑस्ट्रेलियाला ४ मार्चपासून पाकिस्तानविरुद्ध (Australia Vs Pakistan Test) तीन सामन्यांची कसोटी मालिका खेळायची आहे. ऑस्ट्रेलियन संघाचा सलामीवीर उस्मान ख्वाजाही (Usman Khawaja) पाकिस्तानविरुद्धच्या प्लेइंग इलेव्हनचा भाग असू शकतो. उस्मान ख्वाजाचा जन्म पाकिस्तानात झाला असला तरी तो आता ऑस्ट्रेलियाचा महत्त्वाचा खेळाडू आहे. पाकिस्तानच्या खेळाडूंच्या पचनी पडणार नाही असं वक्तव्य त्यानं या मालिकेपूर्वी केलं. त्यानं पाकिस्तानी माध्यमांसमोर इंडियन प्रीमिअर लीगचं (IPL) खुप कौतुक केलं. तसंच पाकिस्तान प्रीमिअर लीगची त्याच्याशी तुलनाही केली जाऊ शकत नाही, असं तो म्हणाला. पीएसएल आणि आयपीएल यांच्यात कोणतीही तुलना केलीच जाऊ शकत नसल्याचं त्यानं सांगितलं.
"नक्कीच, आयपीएल ही जगातील महत्त्वाच्या लीगपैकी एक आहे. पीएसएल आणि आयपीएलची कोणतीही तुलनाच नाही. अखेर संपूर्ण जग आयपीएल खेळण्यासाठी जातं. ती एकमेव लीग आहे जिकडे भारतीय खेळाडू खेळतात. हे आयपीएलला जगातील बेस्ट लीग सिद्ध करतं," असं उस्मान ख्वाजा म्हणाला.
उस्मान ख्वाजाही होता आयपीएलचा भागउस्मान ख्वाजा २०१६ मध्ये आयपीएलमध्ये रायझिंग पुणे सुपरजायंट्स टीमचा भाग होता. त्यानं ६ सामन्यांमध्ये २१ पेक्षा अधिकच्या सरासरीने १२७ धावा केल्या होत्या. त्यानंतर त्याला आयपीएलमध्ये खेळण्याची संधी मिळाली नाही. तो टी २० फॉर्मेटच्या उत्कृष्ट खेळाडूंपैकी एक आहे. बिग बॅश लीग, पाकिस्तान सुपर लीगमध्ये त्यानं आपल्या फलंदाजीची कमाल दाखवून दिली होती.
तब्बल तीन दशकांनंतर ऑस्ट्रेलियाचा संघ पाकिस्तानच्या दौऱ्यावर पोहोचला आहे. या दौऱ्यात ३ कसोटी सामने, तीन एकदिवसीय सामने आणि एक टी २० सामना खेळवला जाणार आहे. पहिला कसोटी सामना ४ मार्च रोजी रावळपिंडीत खेळवला जाईल.