चेन्नई : बांगलादेशविरुद्धचा खडतर दौरा आटोपून भारत दौ-यावर आलेल्या आॅस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी दणदणीत सराव करून घेतला. मंगळवारी झालेल्या सराव सामन्यात शानदार विजय मिळवताना कांगारुंनी भारतीय अध्यक्षीय एकादश संघाचा १०३ धावांनी धुव्वा उडवला. प्रथम फलंदाजी करताना आॅस्ट्रेलियाने निर्धारीत ५० षटकांत ७ बाद ३४७ धावा उभारल्यानंतर अध्यक्षीय एकादश संघाचा ४८.२ षटकांत २४४ धावांमध्ये डाव संपुष्टात आणला.एम. चिदंबरम स्टेडियमवर नाणेफेक जिंकून आॅसी कर्णधार स्टिव्ह स्मिथने प्रथम फलंदाजीचा निर्णय घेतला. सलामीवीर डेव्हिड वॉर्नर (६४), कर्णधार स्मिथ (५५), ट्रॅव्हिस हेड (६५) आणि मार्कस स्टोइनिस (७६) यांच्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर आॅस्ट्रेलियाने अध्यक्षीय एकादशपुढे तगडे आव्हान उभे केले.या भल्यामोठ्या आव्हानाचा पाठलाग करताना अध्यक्षीय एकादशची अडखळती सुरुवात झाली. सलामीवीर श्रीवास्तव गोस्वामी (४३) आणि मयांक अगरवाल (४२) यांनी चांगली फलंदाजी केली. मात्र, मधली फलंदाजी ढेपाळल्याने अध्यक्षीय एकादशची ३ बाद १०२ वरून ८ बाद १५६ धावा अशी घसरगुंडी उडाली. अध्यक्षीय एकादशने ५४ धावांत ६ बळी गमावले आणि येथेच त्यांचा दारुण पराभव निश्चित झाला. अक्षय कर्नेवार (४०) आणि कुशांग पटेल (४१*) यांनी तळाच्या फळीत आक्रमक फटकेबाजी करीत संघाचा पराभव काहीसा लांबवला.कर्नेवारने २८ चेंडूंत २ चौकार आणि ४ षटकार मारले, तर कुशांगने ४८ चेंडूंत ५ चौकार व एका षटकारासह नाबाद खेळी केली. या दोघांनी नवव्या विकेटसाठी ६६ धावांची आक्रमक भागीदारी करून आॅस्ट्रेलियाला काहीसे झुंजवले. अॅश्टन एगरने ४४ धावांत ४ बळी घेत अचूक मारा केला. केन रिचडर््सनने २, तर जेम्स फॉल्कनर, अॅडम झम्पा, मार्कस स्टोइनिस यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.तत्पूर्वी, आॅस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिले षटक निर्धाव खेळल्यानंतर सलामीवीर हिल्टन कार्टराइट भोपळाही न फोडता बाद झाला. यामुळे धावसंख्या शून्य असतानाच आॅस्ट्रेलियाला पहिला झटका बसला. यानंतर मात्र डेव्हिड वॉर्नर-स्मिथ या अनुभवी जोडीने १०६ धावांची भागीदारी केली. वॉर्नर ४८ चेंडूंत ११ चौकारांसह ६४ धावा काढून परतला. या वेळी, ठराविक अंतराने यजमानांनी कांगारुंना धक्के दिले. (वृत्तसंस्था) पाहुण्यांच्या सर्वच प्रमुख फलंदाजांनी अर्धशतकी तडाखा देत संघाला आव्हानात्मक मजल मारून दिली. स्टोइनिसने ६० चेंडूंत ४ चौकार व ५ षटकारांची आतषबाजी करीत सर्वाधिक ७६ धावा केल्या. मॅथ्यू वेडने अंतिम षटकांमध्ये तुफानी फटकेबाजी करताना २४ चेंडूंत २ चौकार व ४ षटकारांसह ४५ धावा फटकावल्या. कुशांग पटेल आणि वॉशिंग्टन सुंदर यांनी प्रत्येकी २ बळी घेत चांगला मारा केला.संक्षिप्त धावफलकआॅस्ट्रेलिया : ५० षटकांत ७ बाद ३४७ धावा. (डेव्हिड वॉर्नर ६४, स्टिव्ह स्मिथ ५५, ट्रॅव्हिस हेड ६५, मार्कस स्टोइनिस ७६,मॅथ्यू वेड ४५, वॉशिंग्टन सुंदर २/२३, कुशांग पटेल २/५८) वि. वि. भारतीय अध्यक्षीय एकादश : ४८.२ षटकांत सर्व बाद २४४ धावा (श्रीवास्तव गोस्वामी ४३, मयांक अगरवाल ४२, गुरकिरत सिंग २७, अक्षय कर्नेवार ४०, कुशांग पटेल नाबाद ४१, अॅश्टन एगर ४/४४, केन रिचर्डसन २/३६).
- Cricket Buzz»
- बातम्या»
- आॅस्ट्रेलियाचा दणदणीत सराव, एकतर्फी विजय, भारतीय अध्यक्षीय एकादशला १०३ धावांनी नमविले
आॅस्ट्रेलियाचा दणदणीत सराव, एकतर्फी विजय, भारतीय अध्यक्षीय एकादशला १०३ धावांनी नमविले
बांगलादेशविरुद्धचा खडतर दौरा आटोपून भारत दौ-यावर आलेल्या आॅस्ट्रेलियाने एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेपूर्वी दणदणीत सराव करून घेतला. मंगळवारी झालेल्या सराव सामन्यात शानदार विजय मिळवताना कांगारुंनी भारतीय अध्यक्षीय एकादश संघाचा १०३ धावांनी धुव्वा उडवला.
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 13, 2017 2:27 AM