Join us  

न्यूझीलंडचा ‘गेम’ करण्यास ऑस्ट्रेलिया सज्ज

पाचवेळेचा चॅम्पियन संघ गुणतालिकेत चौथ्या, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: October 28, 2023 9:42 AM

Open in App

मतीन खान, थेट धर्मशालावरुन

धर्मशाला : भारत आणि दक्षिण आफ्रिकेकडून पराभवाचा सामना केल्यानंतर सलग तीन विजय नोंदविणारा ऑस्ट्रेलिया उशिरा का होईना, वनडे विश्वचषकात आक्रमक शैलीत परतला. नेदरलँड्सवर विक्रमी ३०९ धावांनी विजय नोंदविल्यानंतर शनिवारी न्यूझीलंडला धूळ चारण्याच्या निर्धाराने मैदानात उतरेल.

पाचवेळेचा चॅम्पियन संघ गुणतालिकेत चौथ्या, तर न्यूझीलंड तिसऱ्या स्थानावर आहे. सामन्याच्या निमित्ताने धर्मशाला शहर नववधूसारखे सजले असून सर्वत्र विश्वचषकाचे होर्डिंग्ज पहायला मिळतात. विदेशी पाहुण्यांनीदेखील गर्दी केली आहे. विशेषत: ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी मोठ्या संख्येने गर्दी केली. तुलनेत न्यूझीलंडचे चाहते कमी आहेत. स्थानिक चाहत्यांमध्ये ऑस्ट्रेलियाच्या खेळाडूंचा खेळ पाहण्याची उत्सुकता आहे. एका चाहत्याने तर, ‘असे प्रसंग वारंवार येत नाहीत,’ अशी प्रतिक्रिया देत ५५०० रुपयांना तिकीट खरेदी केले. पॅट कमिन्सचा हा संघ न्यूझीलंडविरुद्ध जिंकून उपांत्य फेरीचा दावा भक्कम करू इच्छितो. न्यूझीलंडदेखील जेतेपदाच्या दावेदारांपैकी एक आहे; पण विश्वचषकात ऑस्ट्रेलियाविरुद्धचा त्यांचा रेकॉर्ड खराब आहे. न्यूझीलंडने वनडेत ऑस्ट्रेलियावर सहा वर्षांआधी २०१७ ला अखेरचा विजय नोंदविला होता.  

यांच्यावर असेल नजर...

ऑस्ट्रेलिया : यंदाच्या विश्वचषकात सर्वाधिक ३३२ धावा काढणारा डेव्हिड वॉर्नर, मधल्या फळीत स्टीव्ह स्मिथ, मार्नस लाबुशेन आणि ४० चेंडूंत शतक ठोकणारा ग्लेन मॅक्सवेल यांच्यासह गोलंदाजीत मिचेल स्टार्क, जोश हेजलवूड, पॅट कमिन्स आणि ॲडम झम्पा हे कामगिरीत दमदार ठरले.

न्यूझीलंड : २४९ धावांचे योगदान देणारा डेवोन कॉन्वे, मधल्या फळीत डेरिल मिचेल (२६८ धावा) आणि रचिन रवींद्र (२९० धावा) यांच्यासह गोलंदाज मॅट हेन्री(१० बळी), लॉकी फर्ग्युसन (८ बळी) आणि अनुभवी ट्रेंट बोल्ट (६ बळी) यांच्यावर विजय मिळवून देण्याची जबाबदारी असेल.

सामना : सकाळी १०:३० पासून

 

टॅग्स :वन डे वर्ल्ड कप