मेलबोर्न : भारताविरुद्ध यंदा होणाऱ्या कसोटी मालिकेचे आयोजन व्हायला हवे. त्यामुळे कारकिर्दीला स्थिरता प्रदान करण्यात मदत होईल, असे मत ऑस्ट्रेलियाचा सलामीवीर फलंदाज जो बर्न्सने व्यक्त केले. मी अशा प्रकारच्या मालिकेत खेळण्यास व चमकदार कामगिरी करण्यास उत्सुक आहे, असेही बर्न्स म्हणाला.
भारताला यंदा डिसेंबर-जानेवारीमध्ये चार कसोटी सामने खेळण्यासाठी ऑस्ट्रेलियाचा दौरा करायचा आहे. कोरोना व्हायरस महामारीमुळे या मालिकेबाबत साशंकता निर्माण झाली आहे. या महामारीमुळे जगभरात अडीच लाखांपेक्षा अधिक व्यक्तींचा मृत्यू झाला आहे.बर्न्स गुरुवारी व्हिडिओ कॉन्फ रन्सच्या माध्यमातून संवाद साधताना म्हणाला, ‘भारतीय संघ विश्वदर्जाचा असला तरी माझ्या मते उभय संघांतील लढती बघणे व खेळाडूंना एकमेकांविरुद्ध खेळणे रोमांचक असेल. विश्व मानांकनावर नजर टाकली तर भारतीय संघ अव्वल स्थानी होता, आता आम्ही अव्वल स्थानी आहोत. त्यामुळे सर्वांना या मालिकेची प्रतीक्षा आहे, याची मला कल्पना आहे. एका खेळाडू म्हणून तुम्ही अशा प्रकारच्या मालिकेमध्ये खेळण्यास व चांगली कामगिरी करण्यास उत्सुक असता.’ ऑस्ट्रेलिया आणि भारत या संघांना शानदार गोलंदाजी आक्रमण असलेले संघ मानतो. भारतीय गोलंदाजी आक्रमणाची भिस्त जसप्रीत बुमराह व मोहम्मद शमी यांच्यावर राहील, तर आॅस्ट्रेलियाच्या वेगवान गोलंदाजीचे नेतृत्व जागतिक क्रमवारीतील अव्वल गोलंदाज पॅट कमिन्स करेल. भारतीय संघात विराट कोहली व रोहित शर्मा यांच्यासारखे आक्रमक फलंदाज आहेत, तर आॅस्ट्रेलिया संघ स्टीव्ह स्मिथ व डेव्हिड वॉर्नर यांच्या समावेशामुळे मजबूत आहे.’ - जो बर्न्स