लंडन, अॅशेस 2019 : ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांनी भेदक मारा करत तिसऱ्या कसोटीत इंग्लंडची वाताहत केली. अॅशेसच्या तिसऱ्या कसोटी ऑस्ट्रेलियाने इंग्लंडचा पहिल्या डावात फक्त 67 धावांत खुर्दा उडवल्याचे पाहायला मिळाले.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव इंग्लंडने 179 धावांमध्ये आटोपला होता. त्यावेळी इंग्लंड पहिल्या डावात मोठी आघाडी घेऊन विजयाच्या दिशेने कूच करेल, असे म्हटले जात होते. पण आघाडी तर दूर त्यांना ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येपेक्षा अर्ध्या धावाही करता आल्या नाहीत. यावेळी इंग्लंडच्या दहा फलंदाजांना दोन अंकी धावसंख्या उभारता आली नाही. इंग्लंडकडून सर्वाधिक धावसंख्या जो डेन्लीने केली, डेन्हीला यावेळी 12 धावा करता आल्या.
ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूडने यावेळी पाच बळी मिळवत इंग्लंडचे कंबरडे मोडले. हेझलवूडला यावेळी पॅट कमिन्स (3 बळी) आणि जेम्स पॅटीन्सन (2 बळी) यांनी सुयोग्य साथ दिली.