cheteshwar pujara । इंदूर : सध्या भारतीय संघ मायदेशात ऑस्ट्रेलियाविरूद्ध 4 सामन्यांची कसोटी मालिका खेळत आहे. मालिकेतील पहिले 2 सामने जिंकून यजमान संघाने आघाडी घेतली होती, मात्र तिसरा सामना जिंकून ऑस्ट्रेलियाच्या संघाने विजयाचे खाते उघडले आहे. खरं तर या मालिकेतील तिन्ही सामने 3 दिवसांच्या आतच संपले. भारतीय संघाला तिसऱ्या सामन्यात दारूण पराभवाचा सामना करावा लागला. ज्या खेळपट्टीवर कोणताच फलंदाज टिकू शकला नाही तिथे चेतेश्वर पुजाराने अर्धशतकी खेळी करून डाव सावरण्याचा प्रयत्न केला.
दरम्यान, इंदूर कसोटीत भारताने ऑस्ट्रेलियाला 78 धावांचे लक्ष्य दिले होते आणि त्यात एकट्या पुजाराच्या बॅटमधून 59 धावा आल्या. ऑस्ट्रेलियाच्या संघाने 19 व्या षटकात एक गडी गमावून मालिकेतील पहिला विजय मिळवताना 76 धावांचे लक्ष्य सहज गाठले. भारताला पराभव स्वीकारावा लागला अन् पुजाराची मेहनत व्यर्थ गेली, पण त्याच्या अर्धशतकी खेळीतील केवळ षटकाराने पुजाराला असा पुरस्कार मिळवून दिला, ज्याचा विचार खुद्द पुजारासह संपूर्ण भारतीय संघाने केला नसेल.
79 मीटरच्या षटकाराने मिळाले 1 लाखपुजाराने दुसऱ्या डावात मारलेला षटकार हा त्याच्या कसोटी कारकिर्दीतील 16वा षटकार होता आणि त्या एका षटकाराने पुजाराने लाखो रुपयेही जिंकले. इंदूर कसोटीत सर्वात लांब षटकार मारल्याबद्दल पुजाराची या सामन्यात सर्वात चांगली कामगिरी करणारा खेळाडू म्हणून निवड करण्यात आली. त्याने आपल्या अर्धशतकी खेळीत 79 मीटर लांब षटकार ठोकला. ट्रॉफीसोबतच त्याला 1 लाख रुपयांचा धनादेशही दिला. पुजाराच्या या षटकाराने सर्वांनाच चकित केले होते. कर्णधार रोहित शर्माने देखील या षटकाराचे खास कौतुक केले होते.
तिसऱ्या आणि चौथ्या कसोटीसाठी भारतीय संघ - रोहित शर्मा (कर्णधार), लोकेश राहुल, शुबमन गिल, चेतेश्वर पुजारा, विराट कोहली, केएस भरत, इशान किशन, आर अश्विन, अक्षर पटेल, कुलदीप यादव, रवींद्र जडेजा, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज, श्रेयस अय्यर, सूर्यकुमार यादव, उमेश यादव, जयदेव उनाडकट.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"