ICC Under-19 World Cup Semi Final : वन डे वर्ल्ड कप स्पर्धा २०२३ मध्ये भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या फायनलच्या आठवणी अजूनही ताज्या आहेत. त्यात १९ वर्षांच्या वर्ल्ड कप स्पर्धेत पुन्हा एकदा India vs Australia Final मॅच पाहायला मिळणार आहे. ऑस्ट्रेलिया-पाकिस्तान यांच्यात झालेला उपांत्य फेरीचा दुसरा सामना थरारक झाला. १८० धावांच्या माफक लक्ष्याचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची घसरगुंडी झाली होती. त्यात विजयासाठी केवळ १६ धावा हव्या असताना नववा फलंदाज माघारी परतली अन् ऑस्ट्रेलियन्सच्या ताफ्यात धाकधुक दिसू लागली. पण, शेवटची जोडी जिद्दीने उभी राहिली.
पाकिस्तानने प्रथम फलंदाजी करताना केवळ १७९ धावा केल्या. त्यांचा संपूर्ण संघ ४८.५ षटकांत तंबूत परतला. ऑस्ट्रेलियाच्या टॉम स्ट्रॅकरने २४ धावांत ६ विकेट्स घेऊन पाकिस्तानला धक्के दिले. १९ वर्षांखालील वर्ल्ड स्पर्धेतील ऑस्ट्रेलियाकडून जलदगती गोलंदाजाने केलेली दुसरी सर्वोत्तम वैयक्तिक कामगिरी ठरील. २०१८ मध्ये जेसन राल्स्टनने पापुआ न्यू गिनीवीरुद्ध १५ धावांत ७ विकेट्स घेतल्या होत्या. २००० मध्ये न्यूझीलंडविरुद्ध टीम वेल्सफोर्डने २२ धावांत ५ विकेट्स घेतलेल्या. पाकिस्तानकडून अझान अवैस ( ५२) व अराफत मिन्हास ( ५२) यांनी अर्धशतकी खेळी करून खिंड लढवली होती. त्यांच्यानंतर सलामीवीर शामील हुसैन ( १७) हा सर्वाधिक धावा करणारा पाकिस्तानी फलंदाज ठरला. या तिघांव्यतिरिक्त अन्य फलंदाजांना दुहेरी आकडा पार करता आला नाही.
ऑस्ट्रेलिया हे लक्ष्य सहज पार करेल असे वाटले होते. हॅरी डिक्सन व सॅम कोन्स्टास यांनी ३३ धावांची सलामी दिली. पण, अली रजाने सॅमला ( १४) माघारी पाठवले आणि ऑस्ट्रेलियाच्या डावाची पडझड सुरू झाली. डिक्सन व ऑलिवर पिक यांनी चांगला खेळ करून ४ बाद ५९ वरून संघाला १०२ धावांपर्यंत पोहोचवले होते. पण, मिन्हासने अर्धशतकी झळकावणाऱ्या डिक्सनची विकेट घेतली आणि पुन्हा सामन्याला कलाटणी मिळाली. ऑलिव्हर व टॉम कॅम्बेल यांनी संघर्ष केला होता. ६ बाद १४६ अशा अवस्थेनंतर ऑस्ट्रेलियाचे पुढील तीन फलंदाज पटापट माघारी परतले आणि त्यांची अवस्था ९ बाद १६४ अशी झाली. पिक ४९ आणि कॅम्बेल २५ धावांवर बाद झाला. अली रजा व मिन्हास यांनी ही विकेट मिळवली.
ऑस्ट्रेलियाला २४ चेंडूंत १६ धावांची गरज होती आणि राफ मॅकमिलन व कॅलम व्हिडएर मैदानावर उभे होते. पाकिस्तानला केवळ एक विकेट हवी होती. १६ चेंडूंत ११ धावा हव्या असताना मोहम्मद झीशानच्या बाऊन्सवर ऑसींना चौकार मिळाला. उबैद शाहच्या ४९व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर मॅकमिलनसाठी पायचीतची जोरदार अपील झाली, परंतु अम्पायरने नकार दिला. सोबतच अम्पायरने गोलंदाजाला संयम बाळगण्याच्या सूचना केल्या. ६ चेंडूत ३ धावा हव्या असताना चौकार मिळाला आणि ऑस्ट्रेलियाने १ विकेटने ही मॅच जिंकून फायनलमध्ये धडक दिली. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यात ११ फेब्रुवारीला फायनल होणार आहे.
Web Title: Australia beat pakistan by 1 wicket; TEAM INDIA WILL FACE AUSTRALIA IN THE FINAL OF THIS U-19 WORLD CUP 2024 ON 11TH FEBRUARY
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.