अॅडलेड : डेव्हिड वॉर्नर याने केलेल्या नाबाद शतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने श्रीलंकेला टी२० सामन्यात १३४ धावांनी पराभूत केले. वॉर्नरने आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये आपले पहिले शतक झळकावत जोरदार पुनरागमन केले. आपल्या वाढदिवशीच नाबाद १०० धावा करत वॉर्नरने ऑस्ट्रेलियाला निर्धारित २० षटकांत २३३ धावांचा टप्पा गाठून दिला. वॉर्नरने कर्णधार अॅरॉन फिंच व ग्लेन मॅक्सवेल बरोबर शतकी भागीदारी केली.
धावांचा पाठलाग करताना श्रीलंकेचा संघ २० षटकात ९ बाद ९९ धावा इतकीच मजल मारु शकला. अॅडम झम्पाने १४ धावा देत तीन बळी घेतले. अॅशेस मालिकेत खराब कामगिरी केलेल्या वॉर्नरने फक्त ५६ चेंडूत चार षटकार व दहा चौकारांच्या साह्याने आपले शतक पूर्ण केले. अॅशेस मालिकेत दहा डावात वॉर्नरने फक्त ९५ धावा केल्या होत्या. त्याच्याशिवाय फिंच व मॅक्सवेल यांनीही अर्धशतक झळकावली. यावेळी आंतरराष्ट्रीय टी२० क्रिकेटमध्ये पुनरागमन करणाऱ्या स्टीव्ह स्मिथ याच्यावरही सर्वांचे लक्ष होते. मात्र त्याला फलंदाजीची संधीच मिळाली नाही. श्रीलंकेच्या कासुन रंजिता याने चार षटकांत ७५ धावा दिल्या. टी२० मधील तो सर्वात महागडा गोलंदाज ठरला.यानंतर श्रीलंकेचा संघ ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांचा सामना करु शकला नाही. कमिन्से दोन बळी मिळवले. श्रीलंकेकडून दासुन शनाका याने सर्वाधिक १७ धावा केल्या.