Join us  

INDW vs AUSW: ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला पडली भारतीय चाहत्यांची भुरळ; म्हणाली, 'ही' गोष्ट सर्वात स्पेशल! 

सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे.

By ऑनलाइन लोकमत | Published: December 12, 2022 1:32 PM

Open in App

मुंबई : सध्या भारतीय महिला आणि ऑस्ट्रेलियाच्या महिला संघामध्ये ट्वेंटी-20 मालिकेचा थरार रंगला आहे. मालिकेतील सलामीच्या सामन्यात कांगारूच्या संघाने विजय मिळवला तर दुसऱ्या सामन्यात यजमान संघाने विजय मिळवून मालिकेत 1-1 ने बरोबरी साधली. खरं तर सुपर ओव्हरमधील अखेरच्या चेंडूपर्यंत रंगलेल्या सामन्यात भारतीय महिलांनी बलाढ्य ऑस्ट्रेलियाचा 4 धावांनी पराभव केला. भारताच्या विजयाची हिरो ठरली मराठमोळी स्मृती मानधना. तिने 49 चेंडूत 79 धावांची खेळी करून सामना बरोबरीत सोडवण्यात मोलाची भूमिका पार पाडली. नंतर सुपर ओव्हरमध्ये स्मृतीने 3 चेंडूत एक चौकार आणि एका षटकाराच्या जोरावर 13 धावा काढल्या. लक्षणीय बाब म्हणजे या मालिकेतील सर्व सामने सर्वसामान्यांना देखील स्टेडियमवर मोफत पाहता येणार आहेत. 

दरम्यान, ऑस्ट्रेलियाने प्रथम फलंदाजी करून 20 षटकांत 1 बाद 187 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारतीय संघाने 20 षटकांत 5 बाद 187 धावा केल्या. त्यामुळे धावसंख्या बरोबरीची झाली आणि सामन्याच्या निकालासाठी सुपर ओव्हर खेळवावी लागली. सुपर ओव्हरच्या पहिल्या चेंडूवर भारताच्या रिचा घोषने षटकार ठोकला तर दुसऱ्या चेंडूवर ती बाद झाली. भारताकडून तिसऱ्या चेंडूचा सामना कर्णधार हरमनप्रीत कौरने केला आणि 1 धाव काढून स्मृतीला फलंदाजीची संधी दिली. मानधनाने याचा पुरेपुर फायदा घेत आपल्या पहिल्याच चेंडूवर चौकार नंतर एक षटकार आणि अखेरच्या चेंडूवर 3 धावा काढल्या. भारताने सुपर ओव्हरमध्ये कांगारूसमोर विजयासाठी 21 धावांचे आव्हान ठेवले होते. 

ऑस्ट्रेलियाच्या कर्णधाराला भारतीय चाहत्यांची पडली भुरळरविवारचा सामना पार पडल्यानंतर पत्रकार परिषदेत ऑस्ट्रेलियन कर्णधार एलिसा हिली हिने विविध मुद्द्यांवर भाष्य केले. याशिवाय तिने भारतीय चाहत्यांचे देखील खास कौतुक केले. "क्रिकेटचा काय खेळ झाला, जे भारतात महिला खेळाडूंनी दाखवून दिले. इथे चाळीस हजार चाहते सामना पाहायला आले, ही गोष्ट सर्वात स्पेशल आहे." खरं तर रविवारी झालेल्या डि वाय पाटील स्टेडियमवरील सामना पाहण्यासाठी 40,000 हून अधिक चाहत्यांनी हजेरी लावली होती. भारतीय चाहत्यांचा उत्साह पाहून पाहुण्या संघाच्या कर्णधाराला देखील भुरळ पडल्याचे पाहायला मिळत आहे. 

तत्पूर्वी, भारताने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाच्या महिला संघाला प्रथम फलंदाजीसाठी निमंत्रित केले. त्यानंतर कांगारूच्या संघाची कर्णधार एलिसा हिली हिने ऑस्ट्रेलियन संघाला आक्रमक सुरुवात करून दिली. पण दीप्ती शर्माने हिलीला 25 धावांवर बाद करून पाहुण्या संघाला पहिला धक्का दिला. त्यानंतर मात्र भारताला गोलंदाजीत आणखी यश मिळाले नाही. बेथ मुनी (54 चेंडूत नाबाद 82 धावा) आणि ताहिला मॅकग्रा (51 चेंडूत नाबाद 70 धावा) यांनी दुसऱ्या बळीसाठी अभेद्य 158 धावांची भागीदारी करत ऑस्ट्रेलियाला 20 षटकांत 187 धावांपर्यंत मजल मारून दिली

भारताचा दणदणीत विजय ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 188 धावांच्या आव्हानाचा पाठलाग करताना स्मृती मानधना आणि शेफाली वर्मा यांनी भारताला आक्रमक सुरुवात करून दिली. दोघींनी पहिल्या बळीसाठी 8.4 षटकात 76 धावांचा झंझावाती सलामी दिली. मात्र शेफाली वर्मा (34) आणि जेमिमा रॉड्रिक्स (4) या पाठोपाठ बाद झाल्याने भारताचा डाव अडचणीत आला. त्यानंतर स्मृतीने आपले अर्धशतक पूर्ण करताना हरमनप्रीत कौरसोबत 61 धावांची भागीदारी करत भारतीय संघाचे आव्हान कायम ठेवले. हरमनप्रीत (21) आणि स्मृती मंधाना (49 चेंडूत 79 धावा) या पाठोपाठच्या षटकात बाद झाल्याने भारताचा डाव अडखळला. मात्र रिचा घोष (नाबाद 26) आणि देविका वैद्य (नाबाद 11) यांनी भारताला विजयाच्या उंबरठ्यावर नेले. अखेरीस शेवटच्या चेंडूत 5 धावांची गरज असताना देविकाने चौकार ठोकत भारताला सामन्यात बरोबरी साधून दिली.

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"    

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाभारतीय महिला क्रिकेट संघबीसीसीआयआॅस्ट्रेलियास्मृती मानधना
Open in App