Join us  

भारताविरूद्धच्या वन डे मालिकेपूर्वी ऑस्ट्रेलियाचं टेन्शन वाढलं; कर्णधाराच्या दुखापतीनं तोंड वर काढलं

IND vs AUS ODI : २२ सप्टेंबरपासून भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात वन डे मालिका खेळवली जाणार आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Published: August 05, 2023 3:50 PM

Open in App

भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकापूर्वी यजमान भारतीय संघाची ऑस्ट्रेलियाविरूद्ध अग्निपरीक्षा असणार आहे. कारण ५ ऑक्टोबरपासून सुरू होत असलेल्या वन डे विश्वचषकापूर्वी टीम इंडिया बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी भिडणार आहे. खरं तर भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात २२ सप्टेंबरपासून तीन सामन्यांची वन डे मालिका खेळवली जाणार आहे. या मालिकेनंतर दोन्हीही संघ विश्वचषक खेळतील. मग पुन्हा एकदा ट्वेंटी-२० मालिकेत हे संघ आमनेसामने असतील. मात्र, या मालिकेच्या आधीच ऑस्ट्रेलियन संघाच्या अडचणीत वाढ झाल्याचे दिसते. 

कर्णधार पॅट कमिन्स मनगटाच्या दुखापतीमुळे त्रस्त असल्याने तो मालिकेला मुकण्याची दाट शक्यता आहे. अलीकडेच पार पडलेल्या शेस मालिकेत ऑस्ट्रेलियन कर्णधाराच्या मनगटाला गंभीर दुखापत झाली होती. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने याबाबत अद्याप स्पष्ट माहिती दिलेली नाही. पण ऑस्ट्रेलियन मीडियाने केलेल्या दाव्यानुसार, कमिन्स दुखापतीमुळे आगामी मालिकेला मुकणार आहे. मागील दोन महिन्यांत सहा कसोटी सामने खेळणाऱ्या पॅट कमिन्सला आरामाची गरज असल्याचे देखील सांगितले जात आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलिया भारत आणि दक्षिण आफ्रिकेविरूद्धच्या मालिकेसाठी पुढील आठवड्यात संघाची घोषणा करण्याची शक्यता आहे. 

वन डे मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा

  1. २२ सप्टेंबर, शुक्रवार - मोहाली, दुपारी १.३० वाजल्यापासून
  2. २४ सप्टेंबर, रविवार - इंदौर, दुपारी १.३० वाजल्यापासून 
  3. २७ सप्टेंबर, बुधवार - राजकोट, दुपारी १.३० वाजल्यापासून

ट्वेंटी-२० मालिकेसाठी ऑस्ट्रेलियाचा भारत दौरा 

  1. २३ नोव्हेंबर, गुरूवार - वायझॅग, सायंकाळी ७ वाजल्यापासून
  2. २६ नोव्हेंबर, रविवार, त्रिवेंद्रम, सायंकाली ७ वाजल्यापासून
  3. २८ नोव्हेंबर, मंगळवार, गुवाहाटी, सायंकाळी ७ वाजल्यापासून
  4. १ डिसेंबर, शुक्रवार, नागपूर, सायंकाळी ७ वाजल्यापासून
  5. ३ डिसेंबर, रविवार, हैदराबाद, सायंकाळी ७ वाजल्यापासून

 

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियावन डे वर्ल्ड कप
Open in App