ICC Men's Test Batting Rankings - ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या फायनलमध्ये भारतावर २०९ धावांनी विजय मिळवून मानाची गदा उंचावली. आयसीसीच्या सर्व प्रमुख ( ट्वेंटी-२०, वन डे वर्ल्ड कप, चॅम्पियन्स ट्रॉफी, WTC ) जिंकणारा ऑस्ट्रेलिया पहिला संघ ठरला. WTC Final मध्ये ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅव्हिस हेड, स्टीव्ह स्मिथ यांनी भारतीय गोलंदाजांची डोकेदुखी वाढवली आणि त्याचा फायदा आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत ऑस्ट्रेलियाला झाला आहे. मार्नस लाबुशेन, स्टीव्ह स्मिथ व हेड यांनी आयसीसी कसोटी फलंदाजांच्या क्रमावारीत टॉप थ्री क्रमांक पटकावून इतिहास घडवला आहे.
ट्रॅव्हिस हेडने ( ८८४ रेटीगं पॉईंट्स) भारताविरुद्धच्या फायनलमध्ये १६३ धावा केल्या आणि क्रमवारीत तीन स्थानांची सुधारणा करताना थेट तिसरे स्थान पटकावले. मार्नस लाबुशेन ( ९०३ रेटीगं पॉईंट्स) व स्टीव्ह स्मिथ ( ८८५ रेटीगं पॉईंट्स) हे अनुक्रमे पहिल्या व दुसऱ्या क्रमांकावर आहेत. ऑस्ट्रेलियाचा आणखी एक फलंदाज उस्मान ख्वाजा ७७७ रेटीगं पॉईंट्ससह नवव्या क्रमांकावर आहेत. फलंदाजांच्या क्रमवारीत टॉप १०मध्ये चार ऑस्ट्रेलियन खेळाडू आहेत. १९८४ मध्ये एकाच संघाचे तीन फलंदाज कसोटी क्रमवारीत अव्वल तीन स्थानी राहिले होते. तेव्हा गॉर्डन ग्रिनीज ( ८१०), क्लाईव्ह लॉईड ( ७८७) आणि लॅरी गोमेस ( ७७३) हे वेस्ट इंडिजचे तीन फलंदाज टॉपला होते.
WTC Final मध्ये दोन डावांत ४८ व ६६* धावा करणाऱ्या अॅलेक्स केरीनेही ११ स्थानांच्या सुधारणेसह ३६व्या क्रमांकावर आला आहे. रोहित शर्मा ( ७२९) आणि विराट कोहली ( ७००) अनुक्रमे १२ व १३ व्या क्रमांकावर आहेत. रिषभ पंत १०व्या क्रमांकावर आहे. गोलंदाजीत ऑस्ट्रेलियाच्या नॅथन लाएनने इंग्लंडच्या ऑली रॉबिन्सनसह संयुक्तपणे सहावे स्थान पटकावले आहे. भारताचा आर अश्विन नंबर वन स्थानावर कायम आहे. अष्टपैलू खेळाडूंमध्ये कॅमेरून ग्रीनने १ स्थान वर सरकला आहे. तो १५व्या क्रमांकावर पोहोचला आहे.