aus vs sl : सध्या भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगला आहे. सोमवारी श्रीलंकेला पराभूत करून ऑस्ट्रेलियन संघाने विजयाचे खाते उघडले. कांगारूंना पहिल्या दोन सामन्यांमध्ये पराभवाचा सामना करावा लागला होता. लखनौच्या एकाना स्टेडियमवर श्रीलंकेच्या पराभवाची हॅटट्रिक झाली. ऑस्ट्रेलियन संघाचे चाहते आपल्या संघाचा विजय साजरा करताना गणपती बाप्पाच्या भक्तीत तल्लीन झाल्याचे पाहायला मिळाले. 'गणपती बाप्पा मोरया'चा गजर करत ऑस्ट्रेलियाच्या चाहत्यांनी आनंद लुटला. सामन्याचा आनंद लुटताना ऑस्ट्रेलियाचे काही चाहते 'गणपती बाप्पा मोरया', 'वंदे मातरम', 'जय माता दी' आणि 'भारत माता की जय'च्या घोषणा देताना दिसले.
कांगारूंच्या चाहत्यांचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खरं तर क्रिकेट सामन्याचा आनंद लुटण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या या चाहत्यांनी भक्ती आणि देशभक्तीचा नारा देत वातावरणाला अध्यात्मिक वळण दिले. बाप्पाच्या जयजयकारासह कांगारूंच्या चाहत्यांनी 'भारत माता की जय'चा नारा दिला.
दरम्यान, व्हायरल होत असलेल्या व्हिडीओमध्ये काही ऑस्ट्रेलियन चाहते ऑस्ट्रेलियाची पिवळ्या रंगाची जर्सी परिधान करून स्टेडियममध्ये सामन्याचा आनंद घेत असल्याचे दिसून येते. ते भारतीय चाहत्यांसोबत या सामन्याचा आनंद घेत आहेत आणि आपल्या संघाला प्रोत्साहन देण्यासाठी गणपती बाप्पा मोरया म्हणत आहेत.
श्रीलंकेच्या पराभवाची हॅटट्रिक
लखनौच्या एकाना क्रिकेट स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या या सामन्यात ऑस्ट्रेलियाने विजय मिळवला. श्रीलंकेच्या संघाने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यावेळी श्रीलंकेचे सलामीवीर पथुम निसांका (६१) आणि कुसल परेरा (७८) यांनी पहिल्या बळीसाठी १२५ धावांची भागीदारी नोंदवली. पण, पथुम बाद झाल्यानंतर श्रीलंकेचा संघ गडगडला आणि अवघ्या २०९ धावांत आटोपला. २१० धावांचे लक्ष्य ऑस्ट्रेलियासाठी अजिबात अवघड नव्हते. डेव्हिड वॉर्नर (११) आणि स्टीव्ह स्मिथ (०) स्वस्तात बाद झाले. मात्र, ऑस्ट्रेलियाने ३६व्या षटकात विजय मिळवला. कांगारू संघाकडून या सामन्यात मिचेल मार्श (५३) आणि जोश इंग्लिस (५८) यांनी अर्धशतके झळकावली आणि ५ गडी राखून संघाच्या विजयाचे खाते उघडले.
Web Title: Australia fans chant Ganpati Bappa Morya, Vande Mataram, Jai Mata Di and Bharat Mata Ki Jai during aus vs sl match in icc odi world cup 2023
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.