ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे. आगीने नेस्तानाबुत झालेलं शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननं त्याची ग्रीन कॅपचा लिलाव करून जवळपास 4.9 कोटी रक्कम जमा केले. इतकेच नव्हे तर वॉर्न आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी निधी गोळा करण्यासाठी एका क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. पण, वॉर्नला काही कारणास्तव या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे या चॅरिटी सामन्यात गिलख्रिस्ट एकादश विरुद्ध पाँटिंग एकादश असा सामना होणार आहे.
ऑस्ट्रेलिया आग : Well Done Sachin Tendulkar; पुनर्वसनासाठी वेळही दिला अन् पैसाही
या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकर मुख्य प्रशिक्षकाच्या भूमिकेत दिसणार असला तरी तो मैदानावरही उतरणार असल्याची माहिती समोर येत आहे. ऑस्ट्रेलियन महिला क्रिकेट संघातील सदस्य एलिसे पेरीच्या विनंतीचा मान राखून तेंडुलकर पुन्हा बॅट हातात घेणार आहे. पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश यांच्यातील चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेक दरम्यान तेंडुलकर एलिसेच्या गोलंदाजीवर चौफेर फटकेबाजी करताना दिसणार आहे.
''ऑस्ट्रेलियात लागलेल्या आगीनंतरच्या पुनर्वसनासाठी तू हातभार लावत आहेस, याचा आनंद आहे. तू चॅरिटी सामन्यातील एका संघाचा प्रशिक्षक आहेस, याची मला जाण आहे, परंतु तुला पुन्हा फलंदाजी करताना आम्हाला आवडेल. यावर आम्ही चर्चाही केली. त्यामुळे तू चॅरिटी सामन्यातील इनिंग ब्रेकमध्ये एक षटक खेळशील का?. या एका षटकातूनही आम्ही काही मदत उभी करणार आहे,'' असे पेरीनं विचारलं.
तेंडुलकरनं तिला उत्तर दिले की,''मलाही ही संकल्पना आवडली. मला मैदानावर उतरून एक षटक खेळायला नक्की आवडेल. खांद्याच्या दुखापतीमुळे डॉक्टरांनी मला क्रिकेटपासून दूर राहण्यास सांगितले आहे, तरीही मी खेळेल. तुमच्या संकल्पनेतून आशा करतो की आपण पुरेसा निधी गोळा करू शकू.''
या सामन्यात कोणते संघ भिडणार?
- पाँटिंग एकादश - मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर, रिकी पाँटिंग ( कर्णधार), एलिसे व्हिलानी, ब्रायन लारा, फोएब लिचफिल्ड, ब्रॅड हॅडीन ( यष्टिरक्षक), ब्रेट ली, वासीम अक्रम, डॅन ख्रिस्टीयन, ल्युक हॉज; प्रशिक्षक - सचिन तेंडुलकर
- गिलख्रिस्ट एकादश - अॅडम गिलख्रिस्ट ( कर्णधार - यष्टिरक्षक), शेन वॉर्न, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, अॅलेक्स ब्लॅकवेल, अॅण्ड्य्रू सायमंड, कर्टनी वॉल्श, निक रिएवोल्ड, पीटर सिडल, फवाद अहमद, ( एक खेळाडू जाहीर होणं आहे); प्रशिक्षक - टीम पेन