ऑस्ट्रेलियातील जंगलाला लागलेल्या आगीत अनेक वन्यजीवांना आपले प्राण गमवावे लागले, तर निसर्गाचीही प्रचंड हानी झाली. या आगीतून ऑस्ट्रेलिया आता कुठे सावरू लागली आहे. आगीने नेस्तानाबुत झालेलं शहर आणि जंगल पुन्हा उभारण्यासाठी आता ऑस्ट्रेलियाला मदत करण्यासाठी अनेक हात सरसावले आहेत. ऑस्ट्रेलियन दिग्गज गोलंदाज शेन वॉर्ननं त्याची ग्रीन कॅपचा लिलाव करून जवळपास 4.9 कोटी रक्कम जमा केले. इतकेच नव्हे तर वॉर्न आणि माजी कर्णधार रिकी पाँटिंग यांनी निधी गोळा करण्यासाठी एका क्रिकेट सामन्याचे आयोजन केले आहे. पण, वॉर्नला काही कारणास्तव या सामन्यातून माघार घ्यावी लागली. त्यामुळे आज होणाऱ्या या चॅरिटी सामन्यात गिलख्रिस्ट एकादश विरुद्ध पाँटिंग एकादश असा सामना होणार आहे. पण, या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी महान फलंदाज सचिन तेंडुलकरनं सढळ हातानं पुनर्वसनासाठी लाखो रुपयांची मदत केली आहे.
हा सामना सिडनी येथे होणार होता, परंतु पावसाच्या शक्यतेमुळे तो आता मेलबर्न येथे होणार आहे. या सामन्यात महान फलंदाज सचिन तेंडुलकरचेही योगदान लाभणार आहे. पण, तेंडुलकर फलंदाज म्हणून नव्हे, तर नव्या भूमिकेत सहभाग घेत ऑस्ट्रेलिया आगीतील पुनर्वसनासाठी मदत करणार आहे. या सामन्यात तेंडुलकर आणि वेस्ट इंडिडचा महान गोलंदाज कर्टनी वॉल्श हे अनुक्रमे पाँटिंग एकादश आणि गिलख्रिस्ट एकादश संघाच्या प्रशिक्षकपदी दिसणार आहेत. पण, आता वॉल्श केवळ प्रशिक्षकाच्या नव्हे तर खेळाडूच्या भूमिकेतही दिसणार आहे.
या सामन्याला सुरुवात होण्यापूर्वी तेंडुलकरनं चॅरिटीसाठी 25 हजार ऑस्ट्रेलियन डॉलर ( 11,93,065 भारतीय रक्कम) रक्कम मदत म्हणून दिल्याचे क्रिकेट ऑस्ट्रेलियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी केव्हीन रॉबर्ट्स यांनी जाहीर केले. ''या मदतीबाबत सचिनला कोणालाच काही सांगायचे नव्हते. मदत करून प्रसिद्धी मिळवणाऱ्यांपैकी तो नाही आणि हा त्याचा मोठेपणा आहे,'' असं दी टेलेग्राफनं दिलेल्या वृत्तात सूत्रांनी सांगितले आहे.
या सामन्यात कोणते संघ भिडणार?
- पाँटिंग एकादश - मॅथ्यू हेडन, जस्टीन लँगर, रिकी पाँटिंग ( कर्णधार), एलिसे व्हिलानी, ब्रायन लारा, फोएब लिचफिल्ड, ब्रॅड हॅडीन ( यष्टिरक्षक), ब्रेट ली, वासीम अक्रम, डॅन ख्रिस्टीयन, ल्युक हॉज; प्रशिक्षक - सचिन तेंडुलकर
- गिलख्रिस्ट एकादश - अॅडम गिलख्रिस्ट ( कर्णधार - यष्टिरक्षक), शेन वॉर्न, ब्रॅड हॉज, युवराज सिंग, अॅलेक्स ब्लॅकवेल, अॅण्ड्य्रू सायमंड, कर्टनी वॉल्श, निक रिएवोल्ड, पीटर सिडल, फवाद अहमद, ( एक खेळाडू जाहीर होणं आहे); प्रशिक्षक - टीम पेन