ऑस्ट्रेलियातील अग्नितांडवात निसर्गाचे सर्वाधिक नुकसान झाले. जवळपास 50 कोटी प्राणी व पक्षी या आगीत मृत पावले. या आगीतील पीडितांसाठी आता अनेक हात पुढे सरसावले आहेत. क्रिकेटपटू, टेनिसपटू, फॉर्म्युला वन चालक, अनेक संस्था पीडितांसाठी निधी गोळा करत आहेत. ऑस्ट्रेलियाचा दिग्गज क्रिकेटपटू शेन वॉर्न यानंही पुनर्वसनासाठी त्याच्या मानाच्या 'बॅगी ग्रीन' कॅपचे लिलाव करण्याचा निर्णय घेतला. चार दिवसांत या कॅपवर विक्रमी बोली लागली. हा लिलाव शुक्रवारी बंद झाला आणि वॉर्नच्या त्या कॅपला 1 मिलियन डॉलर म्हणजेच 4.9 कोटी या कॅपला मिळले. ही संपूर्ण रक्कम पुनर्वसनासाठी देण्यात येणार आहे.
वॉर्ननं सर्वांचे आभार मानले. तो म्हणाला,''कॅपसाठी बोली लावणाऱ्या प्रत्येकाचे आभार. यात यशस्वी झालेल्या व्यक्तिचे विशेष आभार. ही बोली माझ्या अपेक्षेपलीकडची होती. ही सर्वच्या सर्व रक्कम ऑस्ट्रेलिया आगीतील पीडितांच्या पुनर्वसनासाठी वापरण्यात येणार आहे. खूप खूप धन्यवाद.''
भारताने 2011 साली विश्वचषक जिंकला होता. या विश्वचषकावर शिक्कामोर्तब धोनीच्या षटकाराने झाले होते. धोनीने ज्या बॅटने षटकार खेचला होता, त्या बॅटचाही काही दिवसांपूर्वी लिलाव झाला होता. धोनीच्या बॅटचा लिलाव जवळपास 2 लाख 50 हजार डॉलरला झाला होता. हे सर्व विक्रम वॉर्नच्या कॅपनं मोडले.