Aus vs SA Gabba Test: ऑस्ट्रेलिया क्रिकेट संघाने ब्रिस्बेनमधील गाबा मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध खेळला गेलेला पहिला कसोटी सामना जिंकला. हा सामना फक्त दोन दिवस चालला. वेगवान गोलंदाजांना मदत करणाऱ्या या खेळपट्टीवर (Pitch) ऑस्ट्रेलियाने आपली ताकद दाखवून दिली आणि दमदार विजय मिळवला. एकीकडे पाकिस्तानचा संघ मायदेशात ३-० असा पराभूत झाल्याने त्यांची खिल्ली उडवली जात आहे. तर ऑस्ट्रेलियाच्या संघाने मायदेशात दमदार विजय मिळवला तरीही त्यांची 'लाज' निघाल्याचे चित्र आहे.
ऑस्ट्रेलियातील ज्या गाबाच्या खेळपट्टीवर सामना खेळवण्यात आला त्या खेळपट्टीवर जोरदार टीका करण्यात आली. यावर अनेक माजी क्रिकेटपटूंनी प्रश्न उपस्थित केले होते. आता त्यांच्या टीकेला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेकडूनही (ICC) दुजोरा मिळाला आहे. आयसीसीने या खेळपट्टीला 'सरासरीपेक्षा कमी' (Below Average) रेटिंग दिले आहे. ही खेळपट्टी पाहिल्यानंतर आणि दोन दिवसांत सामन्याचा निकाल लागल्यानंतर, ICC मॅच रेफरींच्या एलिट पॅनेलचे सदस्य रिची रिचर्डसन यांनी त्यांचा अहवाल सादर केला. त्यामध्ये त्यांना सरासरीपेक्षा कमी दर्जा देण्यात आला आहे.
रिचर्डसन यांनी आपल्या अहवालात लिहिले की, “एकंदरीत, या कसोटी सामन्यातील गाब्बा खेळपट्टी गोलंदाजांना अधिक अनुकूल होती. चेंडूमध्ये अतिरिक्त उसळी आणि काही वेळा सीमची अधिक हालचाल होत होती. दुसऱ्या दिवशी अनेक चेंडू खालीच राहिले, त्यामुळे फलंदाजांना भागीदारी करणे कठीण झाले होते. आयसीसीच्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार, बॅट आणि बॉलमध्ये समान स्पर्धा नसल्यामुळे मी या खेळपट्टीला सरासरीपेक्षा कमी रेटिंग देतो आहे."
दरम्यान, ऑस्ट्रेलियाने हा सामना सहा गडी राखून जिंकला. या सामन्याच्या पहिल्या डावात दक्षिण आफ्रिकेचा संघ १५२ धावांत गारद झाला होता. यानंतर ऑस्ट्रेलियाने २१८ धावा केल्या. दक्षिण आफ्रिकेचा संघ दुसऱ्या डावात केवळ ९९ धावा करू शकला आणि सर्वबाद झाला. ऑस्ट्रेलियाला ३४ धावांचे लक्ष्य मिळाले, ते पूर्ण करण्यासाठी त्यांनी चार विकेट गमावल्या.
Web Title: Australia Gabba pitch rated below average by ICC trolled on social media just like Pakistan after loss
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.