नवी दिल्ली : सध्या ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर टी-20 विश्वचषकाचा थरार रंगला आहे. एकिकडे स्पर्धेतील सराव सामने खेळवले जात आहेत. तर दुसरीकडे सुपर-12 मध्ये प्रवेश मिळवण्यासाठी 8 संघात लढत होत आहे. अशातच वर्ल्ड चॅम्पियन ऑस्ट्रेलियाने चालाकीचा वापर करून मैदानावर मोठा बदल घडवून आणला आहे, त्याचा व्हिडीओ चर्चेचा विषय बनला आहे. खरं तर यावेळी ऑस्ट्रेलियाने आयसीसीने बनवलेल्या नव्या नियमावर रामबाण उपाय शोधला आहे. आयसीसीने अलीकडेच फिल्डिंग पेनल्टीचे नवीन नियम जारी करताना स्पष्ट केले होते की, जर एखादा संघ आपल्या कोट्यातील 20 षटके वेळेत पूर्ण करू शकला नाही किंवा सामना उशीराने चालत असल्यास संबंधित संघाला त्यांच्या उर्वरित षटकांमध्ये सर्कलमध्ये एक अतिरिक्त फिल्डर ठेवावा लागेल. या नियमाचा कसा सामना करायचा याचे स्पष्टीकरण ऑस्ट्रेलियन खेळाडूने दिले आहे.
दरम्यान, अलीकडेच ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यामध्ये टी-20 मालिका पार पडली. यावेळी यजमान ऑस्ट्रेलियाच्या संघाने चालाकी करून आयसीसीच्या नियमावर मार्ग काढला. या मालिकेदरम्यान ऑस्ट्रेलियाने आपले अतिरिक्त खेळाडू सामन्यातील पॉवरप्लेदरम्यान सीमारेषेजवळ तैनात केले होते. यामागचे कारण वेळ वाचवणे हे होते आणि त्यामुळेच सामन्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये संघाला 30 यार्डच्या सर्कलमध्ये अतिरिक्त फिल्डर ठेवण्याची गरज भासली नाही.
ICCच्या नियमावर ऑस्ट्रेलियाचा रामबाण उपायया घटनेचा व्हिडीओ cricket.com.au ने आपल्या अधिकृत ट्विटर अकाउंटवरून शेअर केला आहे. व्हिडीओमध्ये ऑस्ट्रेलियन फिरकीपटू ॲश्टन अगर संघाच्या योजनेबाबत माहिती देत आहे. अगरने निदर्शनास आणून दिले की पॉवरप्ले दरम्यान त्यांच्या अतिरिक्त खेळाडूंना सीमारेषेजवळ ठेवून संघ अनेक वेळा 10-10 सेकंदांचा वेळ वाचवू शकतो. असे केल्याने त्यांच्या संघाला नंतर फायदा होईल. विशेष बाब म्हणजे ऑस्ट्रेलियाची ही रणनीती कोणत्याही प्रकारे नियमांचे उल्लंघन करत नाही.
इंग्लंडने मारली बाजीटी-20 विश्वचषकापूर्वी ऑस्ट्रेलियाच्याच धरतीवर इंग्लंड आणि यजमान ऑस्ट्रेलिया यांच्यामध्ये टी-20 मालिका पार पडली. इंग्लिश संघाने ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच घरात जाऊन 2-0 ने पराभवाची धूळ चारली होती. तर विश्वचषकाच्या सराव सामन्यात यजमान संघाला भारताकडून पराभवाचा सामना करावा लागला होता. ऑस्ट्रेलियाचा संघ विश्वचषकाचा प्रमुख दावेदार असल्याचे बोलले जात आहे. सुपर-12 च्या साखळी फेरीत ऑस्ट्रेलियाचा पहिला सामना न्यूझीलंडविरूद्ध 22 ऑक्टोबर रोजी होणार आहे.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"