Join us  

ऑस्ट्रेलिया लागली वर्ल्ड कपच्या तयारीला! भारताविरुद्ध उतरवला तगडा संघ

IND vs AUS ODI Series : ऑस्ट्रेलियाचा संघ आज दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिकेतील शेवटचा सामना खेळतोय आणि ते तिथून भारत दौऱ्यावर येणार आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Published: September 17, 2023 4:22 PM

Open in App

IND vs AUS ODI Series : ऑस्ट्रेलियाचा संघ आज दक्षिण आफ्रिकेत वन डे मालिकेतील शेवटचा सामना खेळतोय आणि ते तिथून भारत दौऱ्यावर येणार आहेत. भारतात होणाऱ्या वन डे वर्ल्ड कप स्पर्धेच्या तयारीसाठी ते यजमानांविरुद्ध ३ वन डे सामन्यांची मालिका खेळणार आहेत. त्यासाठी त्यांनी १८ सदस्यांचा तगडा संघ जाहीर केला आहे. या संघात कर्णधार पॅट कमिन्ससह ऑस्ट्रेलियाच्या काही प्रमुख खेळाडूंचे पुनरागमन झाले आहे. २२, २४ आणि २७ सप्टेंबर असे तीन वन डे सामने होणार आहेत.

दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी ऑस्ट्रेलियाच्या संघाला दुखापतीने घेरले होते आणि अनेक प्रमुख खेळाडू या दौऱ्यावर जाऊ शकले नाहीत. कमिन्स आणि स्टीव्ह स्मिथ यांच्या मनगटाला दुखापत झाली होती, तर मिचेल स्टार्कच्या खांद्यामध्ये सूज होती. ग्लेन मॅक्सवेल आफ्रिका दौऱ्यावरील संघाचा सदस्य होता, परंतु ट्वेंटी-२० मालिकेपूर्वी सराव करताना त्याचा पाय मुरगळला आणि पहिल्या बाळाच्या जन्मासाठी तो मायदेशात परतला. पण, आता भारत दौऱ्यासाठी मॅक्सवेलला पूर्णपणे फिट जाहीर केले गेले आहे. कॅमेरून ग्रीनला कन्कशनमुळे आफ्रिकेविरुद्धच्या तीन वन डे सामन्यांना मुकावे लागले होते. ८ दिवसांच्या विश्रांतीच्या नियमानंतर तो पुनरागमन करतोय. 

ऑस्ट्रेलियाचा संघ - पॅट कमिन्स ( कर्णधार), सीन एबॉट, एलेक्स केरी, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रून, जोश हेझलवूड, जोश इंग्लिस, स्पेन्सर जॉन्सन, मार्नस लाबुशेन, मिचेल मार्श, ग्लेन मॅक्सवेल, तनवीर संघा, मॅट शॉर्ट, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा ( Australia squad: Pat Cummins (c), Sean Abbott, Alex Carey, Nathan Ellis, Cameron Green, Josh Hazlewood, Josh Inglis, Spencer Johnson, Marnus Labuschagne, Mitchell Marsh, Glenn Maxwell, Tanveer Sangha, Matt Short, Steve Smith, Mitchell Starc, Marcus Stoinis, David Warner, Adam Zampa) 

ट्रॅव्हिस हेड व अॅश्टन अॅगर यांना वगळल्याने सर्वांना धक्का बसला आहे. अॅगरला दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर दुखापत झाली होती आणि तो ट्वेंटी-२० मालिकेला मुकला होता. वन डे मालिकेत तो पहिल्या सामन्यात खेळला, परंतु पुढील दोन सामन्यांत दुखापतीमुळे नाही खेळला. तोही पहिल्या बाळाच्या जन्मासाठी ऑस्ट्रेलियात परतला.  ट्रॅव्हिस हेडला चौथ्या वन डे सामन्यात दुखापत झाली आणि त्याला भारत दौऱ्याला मुकावे लागले.

टॅग्स :भारत विरुद्ध ऑस्ट्रेलियाग्लेन मॅक्सवेलस्टीव्हन स्मिथ