इंडियन प्रीमिअर लीग २०२४ मध्ये दमदार कामगिरी करूनही ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या संघात युवा फलंदाजाला स्थान न मिळाल्याने अनेकांना आश्चर्य वाटले होते. दिल्ली कॅपिटल्सकडून खेळताना या युवा फलंदाजाने ९ सामन्यांत २३४.४ स्ट्राईक रेटने ३२ चौकार व २८ षटकारांच्या मदतीने ३३० धावा चोपल्या आहेत. त्यामुळे अखेरच निवड समितीला त्याची दखल घ्यावी लागली. ऑस्ट्रेलियाने आगामी ICC Men's T20 World Cup 2024 स्पर्धेसाठी त्यांचा अंतिम १५ जणांचा संघ पक्का केला आणि त्यात जॅक फ्रेझर-मॅकगर्क व मॅट शॉर्ट यांचा राखीव खेळाडू म्हणून समावेश केला गेला आहे.
ऑस्ट्रेलियाने हा अंतिम संघ जाहीर केल्यानंतर अनुभवी स्टीव्ह स्मिथ, जेस बेहरेनडॉर्फ व तनवीर संघ यांना संधी मिळणार नाही, हे निश्चित झाले आहे. मिचेल मार्श ऑस्ट्रेलियान संघाचे नेतृत्व सांभाळणार आहे. डावखुरा फिरकी गोलंदाज अॅश्टन अॅगर याचे संघात पुनरागमन झाले आहे. २०२२ मध्ये तो शेवटचा ट्वेंटी-२० सामना खेळला होता. मार्कस स्टॉयनिस, टीम डेव्हिड व कॅमेरून ग्रीन हे ग्लेन मॅक्सवेलसह अष्टपैलू खेळाडूची जबाबदारी पार पाडतील. आयपीएलमध्ये खेळत असलेले ऑस्ट्रेलियन खेळाडू वगळता अन्य खेळाडू वेस्ट इंडिजमध्ये दाखल झाले आहेत.
फ्रेझर-मॅकगर्क आणि शॉर्ट हे स्पर्धेदरम्यान संघासाठी राखीव खेळाडू म्हणून काम करतील, असे ऑस्ट्रेलियन निवड समितीचे अध्यक्ष जॉर्ज बेली म्हणाले. ऑस्ट्रेलियाचा ट्वेंटी-२० वर्ल्ड कप स्पर्धेसाठीच्या ब गटात समावेश केला गेला आहे आणि त्यांना ५ जूनला ओमानविरुद्ध पहिला सामना खेळायचा आहे. या गटात इंग्लंड, नामिबिया व स्कॉटलंड यांचाही समावेश आहे.
ऑस्ट्रेलियन संघ - मिचेल मार्श ( कर्णधार), अॅश्टन अॅगर, पॅट कमिन्स, टीम डेव्हिड, नॅथन एलिस, कॅमेरून ग्रीन, जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जॉश इंग्लिस, ग्लेन मॅक्सवले, मिचेल स्टार्क, मार्कस स्टॉयनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर, अॅडम झम्पा ( Australia squad: Mitchell Marsh (c), Ashton Agar, Pat Cummins, Tim David, Nathan Ellis, Cameron Green, Josh Hazlewood, Travis Head, Josh Inglis, Glenn Maxwell, Mitchell Starc, Marcus Stoinis, Matthew Wade, David Warner, Adam Zampa)राखीव खेळाडू - जॅक फ्रेझर-मॅकगर्क, मॅट शॉर्ट