ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर

डब्ल्यूटीसी अंतिम सामना : अखेरच्या दिवशी भारताचा २०९ धावांनी पराभव, दुसऱ्यांदा उपविजेतेपदावर समाधान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 12, 2023 06:02 AM2023-06-12T06:02:29+5:302023-06-12T06:03:32+5:30

whatsapp join usJoin us
Australia is the new Test Champion as Aussies dominate all ICC cups | ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर

ऑस्ट्रेलियाच ‘चॅम्पियन’! आयसीसीच्या सर्व चषकांवर ऑसीची मोहोर

whatsapp join usJoin usgoogleNewsNext

अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर

लंडन : स्टार क्रिकेटपटूंचा भरणा असलेल्या भारतीय संघाला सलग दुसऱ्यांदा जागतिक कसोटी अजिंक्यपद (डब्ल्यूटीसी) स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले. बलाढ्य ऑस्ट्रेलियाने रविवारी अखेरच्या दिवशी भारताचे उर्वरित सात फलंदाज केवळ ५५ धावांमध्ये बाद करत पहिल्यांदाच डब्ल्यूटीसी चषक पटकावला. यासह ऑस्ट्रेलिया आयसीसीच्या सर्व स्पर्धा जिंकणारा पहिला संघ ठरला. 

जेतेपदासाठी आवश्यक असलेल्या विश्वविक्रमी ४४४ धावांचा पाठलाग करताना भारताचा डाव ६३.३ षटकांत २३४ धावांवर संपुष्टात आला. विराट कोहली, अजिंक्य रहाणे यांच्यावर मोठी मदार असताना दोघेही फारशी चमक दाखवू शकले नाहीत. वेगवान गोलंदाज स्कॉट बोलँड याने ४७व्या षटकात भारताला मोठे धक्के देताना कोहली आणि रवींद्र जडेजा यांना माघारी परतवले. यानंतर भारताच्या डावाला गळतीच लागली. ५५ धावांत सात फलंदाज गमावल्याने भारताचा डाव तीन बाद १७९ धावांवरून २३४ धावांवर संपुष्टात आला. कोहलीचे अर्धशतक एका धावेने हुकले. त्याने ७८ चेंडूंत ७ चौकारांसह ४९ धावा केल्या. रहाणेने १०८ चेंडूंत ७ चौकारांसह ४६ धावा केल्या. बोलँडने ३, तर अनुभवी फिरकीपटू नाथन लायन याने ४ बळी घेत भारताच्या फलंदाजीतील हवा काढली. पहिल्या डावात दीडशतक ठोकून सामना कांगारूंच्या बाजूने झुकविणारा ट्रॅविस हेड सामनावीर ठरला. सन २०१३ मध्ये भारताने इंग्लंडमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकली होती. हे भारताचे आतापर्यंतचे अखेरचे आयसीसी जेतेपद ठरले आहे. यानंतर भारताला चार वेळा आयसीसी स्पर्धेत उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे.

चार वेळा भारताचे आव्हान उपांत्य फेरीत संपुष्टात आले आहे. नाणेफेकीचा जिंकलेला कौल सोडला, तर या सामन्यात भारताच्या बाजूने काहीही सकारात्मक घडले नाही. दोन वर्षांपूर्वी भारताचा डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात न्यूझीलंडविरुद्ध पराभव झाला होता.

तयारीमध्ये कमी पडले भारतीय

असं वाटलेलं की भारताची फलंदाजी बहरेल आणि हा रविवार ‘सुपर संडे’ ठरेल; पण दुर्दैवाने असे झाले नाही. कोहली आणि रहाणे यांनी ज्याप्रकारे चौथ्या दिवशी लढा दिला होता, त्यावरून भारताच्या आशा उंचावल्या होत्या. पण, अखेरच्या दिवशी पहिल्याच सत्रात मोठी निराशा झाली. कोहली बाद झाल्यानंतर भारताचा डाव गडगडला. रहाणेलाही फारवेळ झुंज देता आली नाही. भारताचा दणदणीत पराभव झाला. स्टीव्ह स्मिथ-ट्रॅविस हेड यांची शतकी खेळी ऑस्ट्रेलियासाठी निर्णायक ठरली. सलग दुसऱ्यांदा भारताला डब्ल्यूटीसी उपविजेतेपदावर समाधान मानावे लागले आहे. भारताने या निर्णायक सामन्यासाठी पुरेसा सराव केला नाही आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे चुकीची संघ निवड केली. सर्वोत्तम असलेला गोलंदाज रविचंद्रन अश्विनला संघाबाहेर कसे काय ठेवू शकता, हे अजूनही कळलेलं नाही. ऑस्ट्रेलियाला त्यांचे श्रेय नक्की जाते; पण भारतीय तयारी करण्यात कमी पडल्याचे जाणवले. आयपीएलला दोष देणार नाही. कारण, आयपीएलमुळे अनेक गुणवान खेळाडू भारताला लाभले आहेत; पण डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यासाठी आपल्या खेळाडूंना भारताने पुरेसा वेळ द्यायला पाहिजे होता. एकाग्रतेचा अभाव, तयारीचा अभाव यामुळे भारताला पराभवाचा सामना करावा लागला.

फायनलमध्ये विराट कोहली ... - सामने : ६, डाव : ८, धावा : २८०

  • १. २०११ विश्वचषक : ३५ धावा, श्रीलंकेविरुद्ध
  • २. २०१३ चॅम्पियन्स ट्रॉफी : ४३ धावा, इंग्लंडविरुद्ध
  • ३. २०१४ टी-२० विश्वचषक : ७७ धावा, श्रीलंकेविरुद्ध
  • ४. २०१७ चॅम्पियन्स ट्रॉफी : ५ धावा, पाकिस्तानविरुद्ध 
  • ५. २०२१ डब्ल्यूटीसी : ४४ आणि १३ धावा, न्यूझीलंडविरुद्ध.
  • ६. २०२३ डब्ल्यूटीसी : १४ आणि ४९ धावा, ऑस्ट्रेलियाविरुद्ध 


धावफलक:

ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा.
भारत (पहिला डाव) : ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा.
ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावा (घोषित)
भारत (दुसरा डाव) :रोहित शर्मा पायचित गो. लायन ४३, शुभमन गिल झे. ग्रीन गो. बोलँड १८, चेतेश्वर पुजारा झे. कॅरी गो. कमिन्स २७, विराट कोहली झे. स्मित गो. बोलँड ४९, अजिंक्य रहाणे झे. कॅरी गो. स्टार्क ४६, रवींद्र जडेजा झे. कॅरी गो. बोलँड ०, श्रीकर भरत झे. व. गो. लायन २३, शार्दूल ठाकूर पायचित गो. लायन ०, उमेश यादव झे. कॅरी गो. स्टार्क १, मोहम्मद शमी नाबाद १३, मोहम्मद सिराज झे. बोलँड गो. लायन १. अवांतर - १३. एकूण : ६३.३ षटकांत सर्वबाद २३४ धावा.
बाद क्रम : १-४१, २-९२, ३-९३, ४-१७९, ५-१७९, ६-२१२, ७-२१३, ८-२२०, ९-२२४, १०-२३४.
गोलंदाजी : पॅट कमिन्स १३-१-५५-१; स्कॉट बोलँड १६-२-४६-३; मिचेल स्टार्क १४-१-७७-२; कॅमरून ग्रीन ५-०-१३-०; नाथन लायन १५.३-२-४१-४.

ऑस्ट्रेलियाचे आयसीसी जेतेपद :

  • वन-डे विश्वचषक : १९८७, १९९९, २००३, २००७, २०१५ 
  • चॅम्पियन्स ट्रॉफी : २००६, २००९ 
  • टी-२० विश्वचषक : २०२१ 
  • डब्ल्यूटीसी : २०२१-२३.


चांगल्या खेळपट्टीवर निराशा : रोहित शर्मा

ऑस्ट्रेलियाविरुद्ध डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात पराभव पत्करावा लागल्यानंतर भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्मा म्हणाला की, गोलंदाजांनी पहिल्या सत्रात शानदार कामगिरी केली. मात्र, खेळपट्टी फलंदाजीला अनुकूल असतानाही फलंदाजांनी निराशा केली. त्यांना चांगल्या खेळपट्टीचा फायदा घेता आला नाही.

Web Title: Australia is the new Test Champion as Aussies dominate all ICC cups

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.