Matthew Wade Retirement: बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीसाठी भारतीय संघ १० नोव्हेंबरला ऑस्ट्रेलियाला रवाना होणार आहे. या दौऱ्यापूर्वीच मॅथ्यू वेड याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. ८ महिन्यांपूर्वी वेडने शेफिल्ड शिल्डची अंतिम फेरी खेळल्यानंतर प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. मॅथ्यू वेड या वर्षी जूनमध्ये भारताविरुद्ध टी२० सामन्यात ऑस्ट्रेलियासाठी शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता.
मॅथ्यू वेडची आंतरराष्ट्रीय कारकीर्द
मॅथ्यू वेडच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीला ऑक्टोबर २०११ मध्ये दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या T20 सामन्याने सुरुवात झाली. तेव्हापासून जून २०२४ पर्यंत, त्याने ९२ T20 आंतरराष्ट्रीय सामने खेळले. त्यात त्याने १२०० धावा केल्या. याशिवाय त्याने ऑस्ट्रेलियासाठी ९७ वनडे सामने खेळले. त्यात त्याने १८६७ धावा केल्या. फेब्रुवारी २०१२ मध्ये ऑस्ट्रेलियासाठी पहिला वनडे खेळणाऱ्या वेडने जुलै २०२१ मध्ये शेवटचा एकदिवसीय सामना खेळला होता.
त्याची कसोटी कारकीर्द एप्रिल २०१२ मध्ये सुरू झाली आणि त्याने जानेवारी २०२१ मध्ये भारताविरुद्ध शेवटची कसोटी खेळली. ऑस्ट्रेलियासाठी ३६ कसोटी खेळलेल्या या यष्टीरक्षक फलंदाजाने मार्च २०२४ मध्ये प्रथम श्रेणी क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. १३ वर्षांच्या आंतरराष्ट्रीय कारकिर्दीत त्याने २२५ सामने खेळले.
वेड ऑस्ट्रेलियन संघाचा नवा प्रशिक्षक
आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतल्यानंतर काय करणार याचाही विचार मॅथ्यू वेडने केला आहे. तो ऑस्ट्रेलियन संघाच्या कोचिंग स्टाफमध्ये सामील होत आहे. ४ नोव्हेंबरपासून सुरू होणाऱ्या पाकिस्तान विरुद्धच्या वनडे मालिकेत तो संघाचा फिल्डिंग आणि कीपिंग कोच असणार आहे.