WTC Standings (Marathi News) : भारतीय संघामागे ऑस्ट्रेलियन्स संघ हात धुवून लागला आहे, असे म्हटल्यास काही चुकीचे ठरणार नाही. जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या २०२१-२३ फायनलमध्ये पराभूत केल्यानंतर ऑस्ट्रेलियाने भारतीय संघाकडून वन डे वर्ल्ड कप हिसकावला आणि त्यानंतर जागतिक कसोटी क्रमवारीत नंबर १ स्थानही घेतले. आता ऑस्ट्रेलियाने आणखी एक धक्का दिला आहे. पाकिस्तानविरुद्धची कसोटी मालिका ३-० अशी जिंकल्याचा ऑस्ट्रेलियाला फायदा तर झाला आहेच, परंतु त्याचा फटका भारताला बसला आहे.
ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी अजिंक्यपद ( ICC World Test Championship 2023-25 ) स्पर्धेच्या तालिकेत अव्वल स्थान पटकावले. ऑस्ट्रेलियाने तिसऱ्या कसोटीत पाकिस्तानवर ८ विकेट्सने विजय मिळवला. पॅट कमिन्सच्या नेतृत्वाखाली ऑस्ट्रेलियाचा संघ WTC जेतेपद कायम राखण्याच्या मोहिमेवर निघाला आहे. सिडनी कसोटी जिंकून ऑस्ट्रेलियाने ३-० अशा फरकाने पाकिस्तानचे नाक ठेचले. कालच ऑस्ट्रेलियाने जागतिक कसोटी क्रमवारीत भारताकडून नंबर १ स्थान हिसकावले होते. आज जाहीर झालेल्या WTC च्या गुणतालिकेत ऑस्ट्रेलियाने वर्चस्व गाजवलेले पाहायला मिळतेय.
ऑस्ट्रेलियाचा संघ ५६.२५ टक्केवारीसह गुणतालिकेत अव्वल स्थानावर पोहोचला आहे. त्यानी ५४.१६ टक्केवारी असलेल्या भारताला दुसऱ्या स्थानावर ढकलले आहे. पाकिस्तानची या कसोटी मालिकेपूर्वी ४५.८३ टक्केवारी होती, परंतु आता त्यात ३६.६६ टक्के अशी घसरण झाली आहे आणि ते सहाव्या क्रमांकावर फेकले गेले आहेत.
तिसऱ्या कसोटीत काय घडले?- मोहम्मद रिजवान ( ८८), आगा सलमान ( ५३) व आमेर जमाल ( ८२) यांच्या फटकेबाजीने पाकिस्तानने पहिल्या डावात ३१३ धावा केल्या. - ऑस्ट्रेलियाला पहिल्या डावात २९९ धावा करता आल्या. जमालने ६९ धावांत ६ विकेट्स घेतल्या.- १४ धावांची आघाडी मिळवूनही पाकिस्तानचा दुसरा डाव ११५ धावांवर गडगडला. सईम आयुब ( ३३) सर्वाधिक धावा करणारा फलंदाज ठरला. जोश हेझलवूड ( ४-१६) व नॅथन लियॉन ( ३-३६) यांनी चांगली गोलंदाजी केली.- ऑस्ट्रेलियाने २५.५ षटकांत हा विजय मिळवला. डेव्हिड वॉर्नर व मार्नस लाबुशेन यांनी मॅच विनिंग अर्धशतक झळकावले.