Join us  

ऑस्ट्रेलियाने मालिकेआधी स्वत:ला ठोसा मारून घेतला!

ग्रेग चॅपेल : पराभवावर केली कठोर टीका

By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2023 5:36 AM

Open in App

सिडनी : भारतीय संंघ दुबळा वाटतो, ऑस्ट्रेलिया कसोटी मालिका सहज जिंकेल, अशी फुशारकी मारणारे ऑस्ट्रेलियाचे महान खेळाडू ग्रेग चॅपेल यांनी आपल्या संघाच्या दोन दारुण पराभवानंतर यू टर्न घेतला. आता ते आपल्याच खेळाडूंवर तोंडसुख घेण्यास बाध्य झालेले दिसतात.

 माइक टाससनचा दाखला देत चॅपेल यांनी कसोटी मालिकेतील पहिला चेंडू पडण्याआधीच ऑस्ट्रेलियाने स्वत:च्या तोंडावर ठोसा मारून घेतला, या शब्दात ऑस्ट्रेलियाच्या खेळावर कठोर टीकास्त्र सोडले. चारपैकी दोन सामने गमावल्यामुळे ऑस्ट्रेलियाने बॉर्डर- गावसकर ट्रॉफीदेखील गमावली. दोन्ही सामने तीन दिवसांत संपले होते. चॅपेल म्हणाले, ‘जोवर स्वत:च्या तोंडावर ठोसा मारला जात नाही तोवर प्रत्येकाकडे कुठली तरी योजना असते,’ असे माइक टायसनने इव्हांडर होलिफिल्डविरुद्धच्या लढतीआधी म्हटले होते. या ओळींची आठवण करून देत  चॅपेल यांनी सिडनी मॉर्निंग हेरॉल्डमध्ये लिहिले, ‘सुरुवातीचे दोन्ही कसोटी सामने पाहिल्यानंतर मी या निर्णयावर आलो की ऑस्ट्रेलियाने पहिला चेंडू टाकण्याआधीच स्वत:च्या तोंडावर ठोसा हाणून घेतला.’

चॅपेल यांनी भारत दौऱ्यातील ऑस्ट्रेलियाची तयारी आणि डावपेचांवर प्रश्न उपस्थित केले.  ते म्हणाले, ‘डावपेच आखणे चांगले असले तरी त्रुटीपूर्ण आधारे डावपेच आखणे ही व्यर्थ बाब आहे.’

नागपुरात एक डाव १३२ धावांनी पराभव झाल्यानंतर ऑस्ट्रेलियाने दिल्लीतील दुसऱ्या सामन्यात पॅट कमिन्सच्या रूपाने एकच वेगवान गोलंदाज खेळविला. स्कॉट बोलॅन्डऐवजी डावखुरा फिरकीपटू मॅथ्यू कुहनमॅन याला संधी दिली. यावर चॅपेल म्हणाले, ‘ऑस्ट्रेलियाने मालिका जिंकण्यासाठी स्वत:च्या बलस्थानांसह खेळण्याची गरज होती. फिरकी गोलंदाजी आमची ताकद नाही. फिरकीपटूंची संघात निवड करणे ही भारतात यश मिळविण्याची पद्धत नाही. आम्हाला आमचे सर्वश्रेष्ठ वेगवान गोलंदाज निवडून त्यांच्यावर विश्वास टाकायला हवा होता. फलंदाजांनी चांगली कामगिरी करावी यासाठी त्यांना प्रोत्साहन देण्याची गरज होती.’

टॅग्स :आॅस्ट्रेलिया
Open in App