चेन्नई : भारतासारख्या मजबूत संघाविरुद्ध कडव्या आव्हानाला सामोरे जाण्यापूर्वी अननुभवी संघासोबत लढत होणे कुठल्याही संघासाठी चांगली तयारी मानल्या जाणार नाही, पण आॅस्ट्रेलिया संघ मंगळवारी भारतीय अध्यक्षीय एकादशच्या कमकुवत समजल्या जाणा-या संघाविरुद्ध पूर्ण तयारीनिशी उतरणार आहे.
स्टीव्ह स्मिथच्या नेतृत्वाखालील आॅस्ट्रेलिया संघ बांगलादेशविरुद्ध दोन कसोटी सामन्यांची मालिका बरोबरी सोडविल्यानंतर येथे पोहोचला आहे. मंगळवारी खेळल्या जाणा-या सराव सामन्याच्या निमित्ताने या संघाला मर्यादित षटकांच्या क्रिकेटसोबत जुळवून घेण्याची संधी मिळणार आहे. एकदिवसी़य क्रिकेटमधील विद्यमान विश्वविजेता संघ फिरकीपटूंविरुद्ध संघर्ष करीत असल्याचे चित्र आहे. फिरकीपटूंना अनुकूल परिस्थितीसोबत जुळवून घेणे आमच्यासाठी आव्हान असल्याचे स्मिथने कबूल केले आहे.
आॅस्ट्रेलियाला ज्या खेळाडूंच्या आव्हानाला सामोरे जायचे आहे त्यात केवळ गुरकिरत मान यालाच आंतरराष्ट्रीय सामना खेळण्याचा अनुभव आहे. त्याने २०१६ मध्ये आॅस्ट्रेलियाविरुद्ध तीन वन-डे सामने खेळले होते. त्यानंतर त्याला संघात पुनरागमन करता आले नाही. भारताचे जास्तीत जास्त खेळाडू दुलीप ट्रॉफी स्पर्धेत व्यस्त आहेत. त्यामुळे निवड समितीने सराव सामन्यासाठी निवडलेल्या संघात जास्तीत जास्त अनोखळी खेळाडू आहेत, पण त्यांना स्वत:ला सिद्ध करण्याची चांगली संधी आहे.
आॅस्ट्रेलियाचा कर्णधार स्मिथ आणि उपकर्णधार डेव्हिड वॉर्नर त्यांचे संघाचे दोन मुख्य फलंदाज आहेत. वॉर्नरने बांगलादेशविरुद्ध दोन शतकी खेळी केल्या. स्मिथला अनुभवी अॅरोन फिंच, ग्लेन मॅक्सवेल आणि अन्य खेळाडूंकडूनही चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे. आॅस्ट्रेलिया संघात अनेक अष्टपैलू खेळाडू असून त्यात जेम्स फॉकनर, मार्कस् स्टोनिस, नॅथन कुल्टर नाईल आदींचा समावेश आहे. या सर्वांना आयपीएलमध्ये सहभागी होत असल्यामुळे भारतीय खेळपट्ट्यांवर खेळण्याचा अनुभव आहे.
सराव सामन्यात चांगली कामगिरी करणारे खेळाडू रविवारी खेळल्या जाणा-या पहिल्या वन-डे लढतीत अंतिम संघात स्थान मिळवण्याचे हकदार असतील. मॅक्सवेल व यष्टिरक्षक मॅथ्यू वॅडसाठी ही मालिका महत्त्वाची आहे. कारण बांगलादेशमध्ये या दोघांची कामगिरी साधारण ठरली होती. (वृत्तसंस्था)
यातून निवडणार संघ
अध्यक्षीय एकादश : गुरकीरतसिंग मान, मयांक अगरवाल, अवेश खान, शिवम चौधरी, श्रीवत्स गोस्वामी, अक्षय कर्नेवार, कुलवंत खेज्रोलिया, कुशांग पटेल, गोविंदा पोद्दार, नितिश राणा, संदीप शर्मा, राहिल शाह, राहुल त्रिपाठी आणि वॉशिंग्टन सुंदर.
आॅस्ट्रेलिया : स्टीव्हन स्मिथ (कर्णधार), अॅस्टन एगर, हिल्टन कार्टराइट, नॅथन कुल्टर-नाइल, पॅट कमिन्स, जेम्स फॉल्कनर, अॅरोन फिंच, जोश हेजलवूड, ट्राविस हेड, ग्लेन मॅक्सवेल, मार्कस स्टोइनिस, मॅथ्यू वेड, डेव्हिड वॉर्नर आणि अॅडम झम्पा.
Web Title: Australia ready to dominate against the inexperienced team, today's practice match against the president's XI
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.