सिडनी : फलंदाजांच्या दमदार कामगिरीपाठोपाठ झाय रिचर्डसनच्या भेदक माऱ्याच्या बळावर आॅस्ट्रेलियाने शनिवारी पहिल्या वन-डे सामन्यात भारताचा ३४ धावांनी पराभव करीत आंतरराष्टÑीय क्रिकेटमध्ये एक हजाराव्या ऐतिहासिक विजयाची नोंद केली. फेब्रुवारी २०१७ पासून २४ वन- डेत आॅस्ट्रेलियाचा हा केवळ चौथा विजय ठरला.
आॅस्ट्रेलियाच्या २८९ धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारत ५० षटकांत ९ बाद २५४ धावांपर्यंतच पोहोचू शकला. रोहित शर्माने २२ व्या शतकी खेळीत १३३ धावांचे योगदान दिले. रिचर्डसनने २६ धावांत चार गडी बाद करीत सामना हिसकावून घेतला. पदार्पण करणारा बेहरनडार्प आणि मार्कस् स्टोयनिस यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले. रोहितने १२९ चेंडूंच्या खेळीत दहा चौकार आणि सहा षट्कार खेचले. भारताने चार गडी लवकर गमवताच संकट ओढवले होते. महेंद्रसिंग धोनीसोबत(५१) चौथ्या गड्यासाठी १३७ धावांची भागीदारी करीत रोहितने विजयाची आशा पल्लवित केली होती; पण धावगती कायम राखण्यात फलंदाज अपयशी ठरल्याने लक्ष्याचा पाठलाग करण्यात अपयश आले.
त्याआधी, आॅस्ट्रेलियाने पीटर हॅन्डस्कोम्ब(७३), उस्मान ख्वाजा(५९) आणि शॉन मार्श(५४) यांच्या अर्धशतकांच्या बळावर पाच गड्यांच्या मोबदल्यात २८८ धावा उभारल्या. हॅन्डस्कोम्बने ६१ चेंडूंत सहा चौकार आणि दोन षट्कार खेचले. त्याने स्टोयनिससोबत पाचव्या गड्यासाठी ६८ धावांची भागीदारी केली. अखेरच्या सात षटकांत यजमानांनी ८० धावा वसूल केल्या. भारताकडून कुलदीप यादव आणि भुवनेश्वर कुमार यांनी प्रत्येकी दोन, तसेच रवींद्र जडेजाने एक गडी बाद केला.
पाठलाग करणाºया भारताने चार षटकांत चार धावांत तीन गडी गमावले होते. शिखर धवन आणि अंबाती रायडू भोपळाही फोडू शकले नाहीत, तर कर्णधार कोहली तीन धावा काढून झेलबाद झाला. सलामीला आलेल्या रोहितने पहिल्या १७ चेंडूंवर एकही धाव घेतली नव्हती. फ्री हिटवर षट्कार खेचूनच त्याने स्वत:चे खाते उघडले. भारताने सुरुवातीच्या दहा षटकांत तीन गडी गमावून २१ धावा केल्या होत्या.रोहितने ११० चेंडूंत स्वत:चे २२ वे शतक गाठले. नंतर ४३ षटकांत भारताने २०० धावा फळ्यावर लावल्या. अखेरच्या सहा षटकांत विजयासाठी ७६ धावांची गरज होती. जडेजा(८)पाठोपाठ रोहित झेलबाद होताच भारताच्या आशा मावळल्या. भुवनेश्वर २९ धावांवर नाबाद राहिला. मालिकेतील दुसरा सामना १५ जानेवारीला आहे .(वृत्तसंस्था)धावफलकआॅस्ट्रेलिया : अॅलेक्स केरी झे. रोहित गो. कुलदीप २४, अॅरोन फिंच त्रि. भुवनेश्वर ६, उस्मान ख्वाजा पायचित गो. जडेजा ५९, शॉन मार्श झे. शमी गो. कुलदीप ५४, पीटर हॅन्डसकोम्ब झे. धवन गो. भुवनेश्वर ७३, मार्कस् स्टोयनिस नाबाद ४७, ग्लेन मॅक्सवेल नाबाद ११, अवांतर १४, एकूण : ५० षटकांत ५ बाद २८८. गडी बाद क्रम : १/८, २/४१, ३/१३३, ४/१८६, ५/२५४.गोलंदाजी : भुवनेश्वर १०-०-६६-२, खलील ८-०-५५-०, शमी १०-०-४६-०, कुलदीप १०-०-५४-२, जडेजा १०-०-४८-१, रायुडू २-०-१३-०.भारत : रोहित शर्मा झे. मॅक्सवेल गो. स्टोयनिस १३३, शिखर धवन पायचित गो. बेहरनडार्प ००, विराट कोहली झे. स्टोयनिस गो. रिचर्डसन ३, अंबाती रायडू पायचित गो, रिचर्डसन ००, महेंद्रसिंग धोनी पायचित गो. बेहरनडार्प ५१, दिनेश कार्तिक गो. रिचर्डसन १२, रवींद्र जडेजा झे. शॉन मार्श गो. रिचर्डसन ८, भुवनेश्वर नाबाद २९, कुलदीप यादव झे. उस्मान ख्वाजा गो. पीटर सिडल ३, मोहम्मद शमी झे. मॅक्सवेल गो. स्टोयनिस १, अवांतर : १४, एकूण : ५० षटकांत ९ बाद २५४. गडी बाद क्रम : बेहरनडार्प १०-२-३९-२, रिचर्डसन १०-२-२६-४, पीटर सिडल ८-०-४८-१, नाथन लियोन १०-१-५०-०, मार्कस स्टोयनिस १०-९-६६-२, मॅक्सवेल २-०-१८-०.