- अयाज मेमन, कन्सल्टिंग एडिटर, लंडन: ओव्हलवर सुरू असलेल्या डब्ल्यूटीसी अंतिम सामन्यात ऑस्ट्रेलियाने भारताला विजयासाठी शनिवारी ४४४ धावांचे लक्ष्य दिले. लक्ष्याचा पाठलाग करताना भारताने दुसऱ्या डावात चहापानानंतर चौथ्या दिवसअखेर २२ षटकांत ३ गड्यांच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात सर्वबाद ४६९ धावा कुटल्या. प्रत्युत्तरात भारताने सर्वबाद २९६ धावा केल्या. त्यानंतर चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाने ८४.३ षटकांमध्ये आठ गडी गमावत २७० धावांपर्यंत मजल मारली आणि दुसरा डाव घोषित केला. त्यामुळे ऑस्ट्रेलियाने ४४३ धावांची आघाडी घेतली होती. यष्टिरक्षक- फलंदाज ॲलेक्स कॅरीने १०५ चेंडूत ८ चौकारांच्या मदतीने ६६ धावांची अर्धशतकी खेळी केली.
४४ षटकांत ४ बाद १२३ वरून पुढे खेळणाऱ्या ऑस्ट्रेलियाला उमेश यादवने सेट झालेल्या मार्नस लाबुशेनला ४१ धावांवर बाद करत पहिला धक्का दिला. रवींद्र जडेजाने स्टीव्ह स्मिथला ३४ धावांवर झेलबाद केले. फॉर्ममध्ये असलेल्या ट्रॅव्हिस हेडलाही जडेजाने १८ धावांवर माघारी पाठवले.
त्यानंतर कॅमरूनलाही जडेजाने २५ धावांवर क्लीन बोल्ड केले. त्यानंतर मात्र ॲलेक्स कॅरीने अप्रतिम फलंदाजी करीत ६६ धावांची नाबाद खेळी केली. तर मिचेल स्टार्कने ४१ धावांचे योगदान दिले. कॅरी- मिचेल स्टार्क यांनी सातव्या विकेटसाठी ९३ धावांची दमदार भागीदारी केली.
रोहित १३ हजारी
रोहित शर्माने सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये १३००० धावा पूर्ण केल्या. सलामीवीर म्हणून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये भारताकडून अशी कामगिरी करणारा रोहित तिसरा फलंदाज ठरला. यापूर्वी सचिन तेंडुलकर आणि विरेंद्र सेहवागने ही कामगिरी केली आहे. रोहितने ३०७ डावात ही कामगिरी केली. कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक षटकार मारणाऱ्या भारतीय खेळाडूंमध्ये रोहित शर्माने सचिन तेंडुलकरला मागे टाकले. या यादीत अव्वल क्रमांकावर वीरेंद्र सेहवाग आहे.
कांगारूंची नियोजनबद्ध फलंदाजी
ऑस्ट्रेलियाने आपल्या भक्कम फलंदाजीच्या जोरावर भारतापुढे खडतर आव्हान उभे केले आहे. चौथ्या दिवसाचा खेळ सुरू झाला तेव्हा कांगारूंनी एका रणनीतीनुसार फलंदाजी केली. झटपट धावा काढण्याच्या नादात त्यांनी हवेत फटके मारले नाहीत. नियोजनबद्ध फलंदाजी करण्यावर त्यांनी भर दिला. भारतीय गोलंदाजांनीही भेदक मारा केला. पण, चौथ्या डावात १३७ षटकांमध्ये ४४४ धावा करणे भारतासाठी सोपे नसेल. खेळपट्टीवर भेगा पडायला लागल्या आहेत. याचा निश्चितच फायदा ऑस्ट्रेलियाच्या गोलंदाजांना होईल. भारतीय संघापुढे एक विक्रमी लक्ष्य सर करण्याचे आव्हान आहे. जर यात भारत यशस्वी ठरला तर तो एक ऐतिहासिक विजय ठरेल. समजा, सामना अनिर्णित झालाच तर दोन्ही संघांना संयुक्तपणे विजेता घोषित करण्यात येईल. पण, १३७ षटके खेळपट्टीवर टिकून राहणे निश्चितच सोपी गोष्ट नाही. त्यामुळे सकारात्मक खेळ करण्यावरच भारतीय फलंदाजांनी भर द्यायला हवा. माझ्या मते, ऑस्ट्रेलिया विजयी होण्याची शक्यता ६५ टक्के आहे. तर, सामना अनिर्णित राहण्याची शक्यता २५ टक्के. याशिवाय भारताच्या जिंकण्याची शक्यता मला १० टक्केच वाटते आहे. खरे तर भारतीयांनी या सामन्यात कधीच नांगी टाकली नाही. मात्र, प्रत्येक सत्रात ऑस्ट्रेलिया भारताच्या एक पाऊल पुढेच होता.
गिल आउट की नॉट आउट?
स्कॉट बोलॅंडच्या गोलंदाजीवर शुभमन गिलने स्लिपमध्ये चेंडू मारला. कॅमरून ग्रीनने तो झेल पकडला. मात्र, झेल पकडल्यानंतर चेंडू जमिनीला लागल्याचे व्हिडीओत दिसत होते. आधुनिक तंत्रज्ञान असतानाही थर्ड अंपायरने व्हिडीओ झूम आणि फ्रीझ केला नाही. त्यामुळे चाहत्यांसह समालोचकांनी नाराजी व्यक्त केली. गिलला अंपायरने बाद दिल्यानंतर रोहित शर्माने अंपायरशी चर्चा केली. त्यानंतरही गिलला बाद देण्यात आले.
धावफलक
ऑस्ट्रेलिया (पहिला डाव) : १२१.३ षटकांत सर्वबाद ४६९ धावा. भारत (पहिला डाव) : ६९.४ षटकांत सर्वबाद २९६ धावा. ऑस्ट्रेलिया (दुसरा डाव) : उस्मान ख्वाजा झे. भरत गो. उमेश १३, डेव्हिड वॉर्नर झे. भरत गो. सिराज १, मार्नस लाबुशेन झे. पुजारा गो. उमेश ४१, स्टीव्ह स्मिथ झे. ठाकूर गो. जडेजा ३४, ट्रॅविस हेड झे. व गो. जडेजा १८, कॅमरुन ग्रीन त्रि. गो. जडेजा २५, ॲलेक्स कॅरी नाबाद ६६, मिचेल स्टार्क झे. कोहली गो. शमी ४१, पॅट कमिन्स झे. अक्षर गो. शमी ५. अवांतर -२६. एकूण : ८४.३ षटकांत ८ बाद २७० धावा (डाव घोषित). बाद क्रम : १-२, २-२४, ३-८६, ४-१११, ५-१२४, ६-१६७, ७-२६०, ८-२७०. गोलंदाजी : मोहम्मद शमी १६.३-६-३९-२; मोहम्मद सिराज २०-२-८०-१; शार्दूल ठाकूर ८-१-२१-०; उमेश यादव १७-१-५४-२; रवींद्र जडेजा २३-४-२८-३.
भारत (दुसरा डाव) : रोहित शर्मा पायचीत गो. लायन ४३, शुभमन गिल झे. ग्रीन गो. बोलंड १८, चेतेश्वर पुजारा झे. कॅरी गो. कमिन्स २७. अवांतर - ५, एकूण २२ षटकांत ३ बाद ९६. बाद क्रम : १-४१, २-९२, ३-९३, गोलंदाजी : पॅट कमिन्स ६-०-२८-१, स्कॉट बोलंड ७-१-२४-१, मिचेल स्टार्क ५-०-३३-०, कॅमेरून ग्रीन २-०-६-०, नाथन लायन २-०-४-१.