दुबई : दक्षिण आफ्रिकेविरुद्धचा तिसरा कसोटी सामना सुरु होण्यापूर्वीच ऑस्ट्रेलियाला जबर धक्का बसला आहे. कारण दक्षिण आफ्रिकेचा वेगवान गोलंदाज कागिसो रबाडावरचे दोन सामन्यांचे निलंबन आयसीसीने मागे घेतले आहे. त्यामुळे तो ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे.
ऑस्ट्रेलियाचा कर्णधार स्टीव्हन स्मिथला रबाडाने बाद केले होते. त्यावेळी रबाडा चांगलाच आक्रमक झाला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर दोन सामन्यांची बंदी घातली होती. पण आयसीसीचे आचार संहिता आयुक्त मायकल हेरोन यांनी रबाडावरील निलंबन मागे घेतले आहे. त्यामुळे रबाडा आता केप टाऊन येथे होणाऱ्या तिसऱ्या कसोटी सामन्यात खेळणार आहे.
पोर्ट एलिझाबेथ येथे झालेल्या कसोटी सामन्यात रबाडाने स्मिथला बाद केले. त्यानंतर आनंद साजरा करताना रबाडा स्मिथच्या अंगावर जवळपास धावून गेला होता. त्यामुळे आयसीसीने त्याच्यावर कठोर कारवाई केली होती. या प्रकरणाची सहा तास चौकशी करण्यात आली. त्यानंतर हेरोन यांनी त्याच्यावरील निलंबन मागे घेण्याचा निर्णय सुनावला आहे. रबाडाचे निलंबन मागे घेण्यात आले असले तरी त्याला एक डिमेरीट गुण देण्यात आला आहे, त्याचबरोबर रबाडाच्या मानधनातील 25 टक्के रक्कम दंड स्वरुपात कापण्यात येणार आहे.