भारतात होणाऱ्या वन डे विश्वचषकाला आता अवघ्या काही दिवसांचा कालावधी उरला आहे. ५ ऑक्टोबरपासून भारतात वन डे विश्वचषकाचा थरार रंगणार असून सलामीचा सामना इंग्लंड आणि न्यूझीलंड यांच्यात होणार आहे. मात्र, विश्वचषकाच्या तोंडावर बलाढ्य ऑस्ट्रेलियाला मोठा झटका बसला आहे. कांगारूच्या संघाचा डावखुरा फिरकीपटू ॲश्टन एगर २०२३ च्या विश्वचषकातून बाहेर झाला आहे. तो अजूनही दुखापतीतून सावरू शकलेला नाही आणि त्यामुळे तो या स्पर्धेत खेळू शकणार नाही. खरं तर दुखापतीमुळेच तो भारताविरूद्धची वन डे मालिका खेळू शकला नाही.
दरम्यान, ॲश्टन एगर मागील काही कालावधीपासून दुखापतीमुळे त्रस्त आहे. दक्षिण आफ्रिका दौऱ्यापूर्वी जेव्हा तो वेस्टर्न ऑस्ट्रेलियासोबत सराव करत होता तेव्हाच त्याला दुखापत सतावत होती. भारताविरूद्धच्या वन डे मालिकेत त्याचा ऑस्ट्रेलियन संघात समावेश करण्यात आला होता. पण, पहिल्या सामन्यानंतर तो ऑस्ट्रेलियाला परतला होता.
ऑस्ट्रेलियन संघात दुखापतीची मालिका याआधी ॲश्टन एगर फेब्रुवारी-मार्चमध्ये कसोटी मालिकेसाठी भारताच्या दौऱ्यावर आला होता पण त्याला एकही सामना न खेळता ऑस्ट्रेलियाला परत पाठवण्यात आले. कारण ॲश्टनला पहिल्या दोन कसोटी सामन्यांसाठी ऑस्ट्रेलियन संघाच्या प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान मिळाले नाही.
ॲश्टन एगर विश्वचषकातून बाहेर झाला आहे. अशा स्थितीत ऑस्ट्रेलियन संघाला त्याच्या बदलीची घोषणा लवकरात लवकर करावी लागेल. कारण कांगारूच्या संघात आघाडीचा फिरकी गोलंदाज म्हणून फक्त ॲडम झाम्पा शिल्लक आहे. ग्लेन मॅक्सवेलने भारताविरुद्धच्या तिसऱ्या वन डे सामन्यात नक्कीच चांगली कामगिरी केली पण तो नियमित फिरकी गोलंदाज नसल्याने ऑस्ट्रेलियाची डोकेदुखी वाढली आहे.