Setback to Australia, Champions Trophy 2025 | मेलबोर्न : ऑस्ट्रेलियन क्रिकेटला गुरुवारी एकाच दिवशी तीन धक्के बसले. सकाळी अचानकपणे अष्टपैलू मार्कस स्टोइनिस याने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. यानंतर दुपारी, कर्णधार पॅट कमिन्स आणि वेगवान गोलंदाज जोस हेझलवूड दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळू शकणार नसल्याचे स्पष्ट झाले.
स्टोइनिसने क्रिकेटविश्वाला धक्का देताना अचानकपणे एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. विशेष म्हणजे, आगामी चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी ऑस्ट्रेलियाने स्टोइनिसला संघात स्थान दिले होते. टी-२० क्रिकेटसाठी मात्र स्टोइनिस ऑस्ट्रेलियासाठी उपलब्ध राहणार आहे. यामुळे आता ऑस्ट्रेलियाला आपल्या संघात बदलही करावे लागणार आहेत. चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेसाठी सर्व संघांकडे १२ फेब्रुवारीपर्यंत आपला अंतिम संघ घोषित करण्याची मुदत आहे. सध्या सुरू असलेल्या एसए-२० लीगमध्ये खेळत असलेल्या स्टोइनिसला मांसपेशी ताणल्याचा त्रास झाला. यानंतर त्याने निवृत्ती घेतल्याचे सांगितले जात आहे.
स्टोइनिसने म्हटले की, 'ऑस्ट्रेलियासाठी आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळण्याचा प्रवास अविश्वसनीय ठरला आणि यासाठी मी आभारी आहे. माझ्यासाठी हा निर्णय घेणे सोपे नव्हते. माझ्या मते, एकदिवसीय क्रिकेटला निरोप देणे आणि कारकिर्दीच्या पुढील अध्यायावर पूर्ण लक्ष देण्यासाठी हीच योग्य वेळ आहे.'
संघाचे समीकरण बिघडले
एकीकडे, स्टोइनिसने एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असताना, दुसरीकडे कमिन्स आणि हेझलवूड हे दोन प्रमुख वेगवान गोलंदाज दुखापतीमुळे चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत खेळणार नसल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे स्पर्धेला काही दिवस शिल्लक असतानाच ऑस्ट्रेलिया संघाचे समीकरण बिघडले आहे. कमिन्स अद्याप टाचेच्या दुखापतीतून सावरलेला नाही. बॉर्डर-गावसकर करंडक मालिकेतही त्याला या दुखापतीचा त्रास झाला होता. दुसरीकडे, हेझलवूडही पोटरीला झालेल्या दुखापतीतून सावरलेला नाही.
स्टोइनिसने इंग्लंडविरुद्ध २०१५ मध्ये एकदिवसीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले होते. त्याने ७१ एकदिवसीय सामने खेळताना एक शतक आणि सहा अर्धशतकांसह १४९५ धावा काढल्या आहेत. २०१८-२९ मध्ये क्रिकेट ऑस्ट्रेलियाचा सर्वोत्तम एकदिवसीय क्रिकेटपटूचा पुरस्कार स्टोइनिसने पटकावला होता. २०२१ सालच्या टी-२० आणि २०२३ सालच्या एकदिवसीय सामन्यांच्या विश्वचषक विजेत्या ऑस्ट्रेलिया संघात स्टोइनिसचा सहभाग होता.
यामुळे तो भारताविरुद्धच्या अखेरच्या दोन कसोटीत खेळू शकला नव्हता. अष्टपैलू मिचेल मार्श पाठदुखीमुळे याआधीच चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेतून बाहेर झाला आहे.