आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेच्या ( आयसीसी) जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत आतापर्यंत टीम इंडियानं निर्विवाद वर्चस्व गाजवताना अव्वल स्थान कायम राखले आहे. भारतानं 7 पैकी 7 सामने जिंकून 360 गुणांसह हे अव्वल स्थान कायम राखले आहे. पण, 2019मध्ये मिळवलेला हा मान 2020मध्ये टीम इंडियाकडून हिसकावला जाऊ शकतो. अव्वल स्थानाच्या शर्यतीत टीम इंडियाच्या आसपासही कोणताच संघ नव्हता, पण आता हे चित्र आता बदलताना पाहायला मिळत आहे. सोमवारी ऑस्ट्रेलियानं घरच्या मैदानावर तिसऱ्या कसोटी सामन्यात न्यूझीलंडवर दणदणीत विजय मिळवून अव्वल स्थानाच्या दिशेनं मोठी झेप घेतली आहे.
ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यातला तिसरा कसोटी सामना सिडनी येथे खेळवण्यात आला. मार्नस लाबुशेनच्या द्विशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं पहिल्या डावात 454 धावा केल्या. प्रत्युत्तरात त्यांनी न्यूझीलंडचा पहिला डाव 256 धावांत गुंडाळला. नॅथन लियॉननं पाच विकेट्स घेतल्या, तर पॅट कमिन्सनं तीन फलंदाज बाद करून किवींना जबरदस्त धक्का दिला. ऑसींनी दुसरा डाव 2 बाद 217 धावांत घोषित करून किवींसमोर विजयासाठी 416 धावांचे आव्हान ठेवले. डेव्हिड वॉर्नर ( 111*), जो बर्न्स ( 40) आणि मार्नस लाबुशेन ( 59) यांनी दमदार खेळ केला.
किवींना दुसऱ्या डावातही साजेशी कामगिरी करता आली नाही. कॉलिन डी ग्रँडहोम ( 52) वगळता त्यांच्या एकाही फलंदाजाला मैदानावर फार काळ टिकता आले नाही. लियॉननं दुसऱ्या डावातही किवींचा निम्मा संघ माघारी पाठवला. यावेळी त्याला मिचेल स्टार्कनं ( 3 विकेट) साथ दिली. ऑस्ट्रेलियानं 279 धावांनी हा सामना जिंकून मालिका 3-0 अशी खिशात घातली.
या निकालासह ऑसींनी जागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धेच्या गुणतालिकेत 120 गुणांची भर घातली. या 120 गुणांमुळे ऑस्ट्रेलियाचे गुण 296 इतके झाले आहेत. त्यामुळे अव्वल स्थानावर असलेल्या टीम इंडिया आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील गुणांचे अंतर बरेच कमी झाले आहे. आता या दोन संघांमध्ये केवळ 64 गुणांचा फरक आहे.