ऑस्ट्रेलियाचा कसोटी कर्णधार टिम पेन याने महिला सहकाऱ्याला अश्लील फोटो आणि अश्लील मेसेज पाठवल्याच्या चौकशीदरम्यान शुक्रवारी कर्णधारपदावरून राजीनामा दिला आहे. हे प्रकरण २०१७चे आहे, काही महिन्यांनंतर पेनला सात वर्षांनी कसोटी संघात परतण्याची संधी मिळाली. त्यावेळी क्रिकेट ऑस्ट्रेलिया आणि क्रिकेट तस्मानियाच्या तपासात पेनला क्लीन चिट देण्यात आली होती.
ऑस्ट्रेलियाला काही दिवसांनी कट्टर प्रतिस्पर्धी इंग्लंडविरुद्ध एशेज मालिका खेळायची आहे. पहिली कसोटी ८ डिसेंबरपासून ब्रिस्बेनमध्ये खेळवली जाणार आहे. ३६ वर्षीय पेनने पत्रकार परिषदेत सांगितले की, मी आज ऑस्ट्रेलियन पुरुष क्रिकेट संघाचे कर्णधारपद सोडत आहे. हा खूप कठीण निर्णय आहे. पण माझ्यासाठी, माझ्या कुटुंबासाठी आणि क्रिकेटसाठी योग्य निर्णय आहे. पुढे म्हणाला की, सुमारे चार वर्षांपूर्वी मी एका महिलेला मेसेज पाठवला होता, जी त्यावेळी माझी सहकर्मचारी होती.
काय आहे संपूर्ण प्रकरण?
पेनने सांगितले की, मी त्या घटनेबद्दल माफी मागितली होती आणि आजही माफी मागतो. मी माझी पत्नी आणि कुटुंबाशी देखील बोललो आणि त्यांची माफी तसेच सहकार्याबद्दल मी आभारी आहे. पेन ऑस्ट्रेलियन संघाचा भाग राहणार आहे. रिपोर्टनुसार, क्रिकेट तस्मानियाच्या एका महिला कर्मचाऱ्याने दावा केला आहे की, पेनने तिला त्याच्या गुप्तांगांच्या छायाचित्रांसह अश्लील संदेश पाठवले. नंतर त्या महिलेने २०१७ मध्येच नोकरी सोडली होती.
दक्षिण आफ्रिकेतील बॉल टॅम्परिंग प्रकरणानंतर पेनला २०१८ मध्ये ऑस्ट्रेलियन कसोटी संघाचे कर्णधारपद देण्यात आले. बोर्डाने पेनचा राजीनामा स्वीकारला असून पुढील कसोटी कर्णधाराचा शोध सुरू आहे. "आम्हाला वाटले की, हे प्रकरण संपले आहे आणि मी संघावर लक्ष केंद्रित करू शकेन," असे पेन म्हणाला. पण मला अलीकडेच कळले की, खाजगी संदेश सार्वजनिक झाले आहेत. २०१७ मधील माझी कृती ऑस्ट्रेलियन क्रिकेट कर्णधार म्हणून सुरू ठेवण्यासाठी आवश्यक असलेल्या निकषांशी सुसंगत नाही.
पेनने कुटुंबीयांची माफी मागितली
माझी पत्नी, कुटुंबीय आणि इतरांना त्रास झाल्याबद्दल मी माफी मागतो, असे पेन म्हणाला. यामुळे खेळाची प्रतिष्ठा दुखावल्याबद्दल मी माफीही मागतो. पेन म्हणाला की, माझ्यासाठी कर्णधारपदाचा तात्काळ राजीनामा देणे योग्य आहे. एशेज मालिकेपूर्वीच्या तयारीत मला कोणताही अडथळा निर्माण करायचा नाही. मी ऑस्ट्रेलियन क्रिकेट संघाचा समर्पित सदस्य राहीन.
क्रिकेट ऑस्ट्रेलियाने एका निवेदनात म्हटले आहे की, बोर्डाचा असा विश्वास आहे की, पेनला काही वर्षांपूर्वी या प्रकरणात क्लीन चिट देण्यात आली होती, परंतु आम्ही त्याच्या निर्णयाचा आदर करतो. अशी भाषा किंवा वागणूक मान्य नाही. ही चूक असूनही, पेन हा उत्कृष्ट कर्णधार आहे आणि त्याच्या सेवेबद्दल आम्ही त्याचे आभार मानतो.
Web Title: Australia Test captain Tim Paine resigns in the case of sending obscene messages to female colleagues
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.