दुबई : ऑस्ट्रेलियाने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध ब्लोमफोन्टेन येथे पहिल्या दोन एकदिवसीय क्रिकेट सामन्यांमध्ये विजय मिळवत आयसीसी एकदिवसीय क्रमवारीत पाकिस्तानला हटवून पुन्हा अव्वल स्थान पटकावले.
डेव्हिड वाॅर्नर आणि मार्नस लाबुशेन यांच्या शतकांच्या मदतीने ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात १२३ धावांनी मोठा विजय मिळवला. ऑस्ट्रेलियाने पहिला सामना तीन गडी राखून जिंकला होता. दुसऱ्या वनडेमध्ये विजय मिळवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे एकूण १२१ गुण झाले आहेत. त्यामुळे पाकिस्तान संघ एका गुणाने पिछाडीवर पडला आहे. भारत ११४ गुणांसह आयसीसी क्रमवारीत तिसऱ्या क्रमांकावर आहे. गतवर्षी चढ-उतारानंतर ऑस्ट्रेलियाने एकदिवसीय क्रमावीरीतील अव्वल स्थान गमावले होते. ऑस्ट्रेलियाला २०२२ मध्ये श्रीलंकेविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता. झिम्बाब्वेनेही ऑस्ट्रेलियाला एका सामन्यात पराभूत केले होते.
ऑस्ट्रेलियाने त्यानंतर न्यूझीलंड आणि इंग्लंडला ३-० असा समान फरकाने पराभूत केले होते. त्यानंतर मार्च २०२३ मध्ये भारताला त्यांच्याच देशात पराभूत केले आणि आता दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या दोन सामन्यांमध्ये विजय मिळवला आहे. पाकिस्तान सध्या आशिया चषकात खेळत आहे. त्यामुळे अव्वल स्थानाची रस्सीखेच सुरूच राहणार आहे.