ॲडलेड : यजमान ऑस्ट्रेलियाने दिवस-रात्र खेळविण्यात येत असलेल्या दुसऱ्या कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी भक्कम पकड मिळविताना इंग्लंडचा पराभव जवळपास निश्चित केला आहे. दुसरा डाव २३० धावांवर घोषित करून कांगारूंनी इंग्लंडला विजयासाठी ४६८ धावांचे विक्रमी लक्ष्य दिल्यानंतर इंग्लंडची चौथ्या दिवसअखेर ४ बाद ८२ धावा अशी अवस्था केली.
पहिल्या डावात २३७ धावांची भक्कम आघाडी घेतलेल्या ऑस्ट्रेलियाने चौथ्या दिवशी १ बाद ४५ धावांवरून सुरुवात केली. मार्नस लाबुशेन (५१) आणि ट्राविस हेड (५१) यांनी अर्धशतकी खेळी करीत यजमानांची स्थिती भक्कम केली. कॅमरून ग्रीनने ४३ चेंडूंत नाबाद ३३ धावांचा वेगवान तडाखा देत संध्याकाळच्या सत्रात संघाच्या धावगतीला वेग दिला. ओली रॉबिन्सन, जो रुट आणि डेव्हिड मलान यांनी प्रत्येकी २ बळी घेतले. ऑस्ट्रेलियाने आपला दुसरा डाव अखेर ९ बाद २३० धावांवर घोषित करीत इंग्लंडपुढे ४६८ धावांचे अशक्यप्राय आव्हान ठेवले.
या आव्हानाचा पाठलाग करताना इंग्लंडचे फलंदाज ढेपाळले. दुसऱ्याच षटकात सलामीवीर हासीब हमीद (०) याला भोपळाही फोडू न देता कांगारूंनी इंग्लंडला इशारा दिला. पहिल्या डावात इंग्लंडसाठी दमदार फलंदाजी केलेल्या डेव्हिड मलानने रोरी बर्न्ससोबत ४४ धावांची भागीदारी करीत संघाला सावरण्याचा प्रयत्न केला.
मात्र, कांगारूंनी इंग्लंडला ठरावीक अंतराने धक्के देत त्यांच्या फलंदाजीला सुरुंग लावला. सर्वात महत्त्वाचे म्हणजे प्रमुख फलंदाज जो रुटही (२४) चांगल्याप्रकारे स्थिरावल्यानंतर बाद झाल्याने इंग्लंडची वाट बिकट झाली आहे. इंग्लंडने ३४ धावांमध्ये मलान, बर्न्स आणि रुट हे तीन प्रमुख फलंदाज गमावल्याने त्यांची दिवसअखेर ४ बाद ८२ धावा अशी अवस्था झाली होती. खेळ थांबला तेव्हा अष्टपैलू बेन स्टोक्स (३*) नाबाद होता. वेगवान गोलंदाज झाय रिचर्डसनने दोन बळी घेत इंग्लंडला जबर धक्के दिले. मिशेल स्टार्क आणि मिशेल नेसेर यांनी प्रत्येकी एक बळी घेतला.
ॲशेसचे वार्तांकन करणाऱ्या दोन पत्रकारांना कोरोनाची लागण
- ऑस्ट्रेलिया आणि इंग्लंड यांच्यात सुरू असलेल्या ॲशेस मालिकेतील दुसरा सामन्याचे वार्तांकन करण्यासाठी आलेल्या दोन पत्रकारांना कोरोनाची लागण झाली आहे. नियमित चाचणी दरम्यान आधी एकाचा अहवाल सकारात्मक आला. त्यानंतर रविवारी आणखी एका पत्रकाराला कोरोनाची लागण झाल्याचे समोर आले.
- या दोघांच्या संपर्कात आलेल्या लोकांना रविवारी स्टेडियममध्ये प्रवेश नाकारण्यात आला होता. या दोघांशी संबंधित असलेल्या माध्यम समूहाला सांगण्यात आले आहे की, जोपर्यंत ऑस्ट्रेलियन आरोग्य विभाग आणि मैदान प्रशासन मंजुरी देत नाही तोपर्यंत तुम्ही या खेळाचे वार्तांकन करू शकणार नाही.