Eng vs AUS 3rd T20: इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तीन सामन्यांच्या टी20 मालिकेतील शेवटचा सामना कॅनबेरा येथे झाला. पावसामुळे या सामन्याचा निकाल लागू शकला नाही. पण पहिले दोन सामने जिंकून इंग्लंडने मालिका २-० अशी खिशात घातली. या सामन्या दरम्यान ऑस्ट्रेलियन संघाचा वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क चर्चेत होता. मिचेल स्टार्कने (Mitchell Starc) इंग्लंडचा कर्णधार जोस बटलरला (Jos Buttler) मॅकडिंग पद्धतीने रन-आऊट करण्याची हुल दिली आणि त्यामुळे पुन्हा एकदा मंकडिंग चर्चेत आल्याचे दिसून आले.
ही संपूर्ण घटना इंग्लंडच्या डावाच्या पाचव्या षटकामध्ये घडली. टीव्ही रिप्लेमध्ये स्टार्कने नॉन-स्ट्राइकला उभ्या असलेल्या बटलरला हुल दिली आणि बोट दाखवली. त्यानंतर मिचेल स्टार्क आणि जोस बटलर यांनी हसत-हसत या गोष्टीबद्दल ऑस्ट्रेलियन माध्यमांशी संवाद साधला. इंग्लंडच्या कर्णधाराला एक इशारा दिल्याचे स्टार्कने सांगितले. तर दुसरीकडे, बटलरने स्टार्कला प्रत्युत्तर देताना सांगितले की, मी नॉन-स्ट्रायकर एंडवरवर असताना लवकर क्रीज सोडत होतो असे मला वाटत नव्हते.
दरम्यान, जोस बटलर यापूर्वी दोन वेळा मंकडिंगचा बळी ठरला आहे. २०१४ मध्ये श्रीलंकेविरुद्धच्या एकदिवसीय सामन्यात सचित्र सेनानायकेने त्याला पहिल्यांदा मंकडिंग पद्धतीने बाद केले होते. त्यानंतर IPL 2019 मध्ये, रविचंद्रन अश्विनने राजस्थान रॉयल्सचा यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलर याला मंकडिंग करत माघारी पाठवले होते. त्या विकेटनंतर तो सामना पूर्णपणे अश्विनच्या संघाच्या बाजूने फिरला होता. मात्र आता अश्विन आणि बटलर दोघे खूप चांगले मित्र बनले आहेत आणि दोघेही IPL 2022 मध्ये राजस्थान रॉयल्ससाठी (RR) एकत्र क्रिकेट खेळतात.