बर्मिंगहॅम, आयसीसी वर्ल्ड कप 2019 : इंग्लंडविरुद्धच्या उपांत्य फेरीच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाची सुरुवात निराशाजनक झाली. अॅरोन फिंच, डेव्हिड वॉर्नर आणि नव्यानं ताफ्यात दाखल झालेला पिटर हँड्सकोम्ब यांना इंग्लंडच्या गोलंदाजांसमोर अपयश आले. ख्रिस वोक्स आणि जोफ्रा आर्चर यांनी ऑसींना धक्के देत त्यांची अवस्था 3 बाद 14 अशी केली. त्यानंतर स्टीव्हन स्मिथ आणि अॅलेक्स केरी यांनी खेळपट्टीवर टिकण्याचा प्रयत्न केला. डावाच्या आठव्या षटकात ऑसींना आणखी एक मोठा धक्का बसता बसता राहीला.
आर्चरने टाकलेल्या आठव्या षटकातील उसळी घेणारा चेंडू केरीच्या जबड्यावर आदळला आणि त्याला दुखापत झाली. चेंडूचा वेग इतका होता की केरीच्या जबड्यावरील कातडी सोलली गेली अन् रक्त वाहू लागलं. केरीच्या जबड्यातून वाहणारं रक्त पाहून ऑसींच्या गोटात चिंता पसरली होती. केरीला तातडीनं वैद्यकीय मदत करण्यात आली. जबड्यावर पट्टी लावून त्यानंतर केरी मैदानावर खेळत राहिला.