जसप्रीत बुमराहच्या नेतृत्वाखालील भारतीय संघानं पर्थच्या मैदानातील कसोटी सामन्यातील 'विराट' विजयासह बॉर्डर गावसकर स्पर्धेतील ५ सामन्यांच्या कसोटी मालिकेत 'यशस्वी'रित्या विजयी सलामी दिली आहे. बॅटिंग आणि बॉलिंग दोन्ही क्षेत्रात सर्वोत्तम कामगिरी करत भारतीय संघाने या कसोटी सामन्यात ऐतिहासिक विजय नोंदवला आहे. पर्थच्या मैदानात ऑस्ट्रेलियावर पहिल्यांदाच पराभवाची नामुष्की ओढावली आहे. पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर कोणत्याही पाहुण्या संघाने ऑस्ट्रेलियाला पराभूत केलेले नाही. पण भारतीय संघानं कांगारूंना इथं चारीमुंड्या चित केले. पर्थ कसोटीतील चौथ्या दिवशीच ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३८ धावांत आटोपून टीम इंडियाने या सामन्यात २९५ धावांनी विजय नोंदवला. सेना देशांतील टीम इंडियाचा कसोटीतील हा सर्वात मोठा विजय आहे.
पहिल्या डावात जबरदस्त कमबॅकपर्थ कसोटी सामन्यात नाणेफेक जिंकून कार्यवाहू कर्णधार जसप्रीत बुमराह याने पहिल्यांदा फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. पहिल्या डावात भारतीय संघ फक्त १५० धावांत आटोपल्यामुळे बॉर्डर गावसकर ट्रॉफी स्पर्धेत भारतीय संघ मागे पडतोय की, काय? असा प्रश्न निर्माण झाला होता. पण कॅप्टन बुमराह आणि त्याला इतर गोलंदाजांनी दिलेली साथ याच्या जोरावर भारतीय संघाने ऑस्ट्रेलियनं संघाला १०४ धावांत रोखत पहिल्या डावात अल्प धावा करूनही ४६ धावांची आघाडी मिळवली.यशस्वी-केएल राहुल अन् विराटची क्लास खेळी दुसऱ्या डावात भारतीय संघाने फलंदाजीतील आपली ताकद दाखवून दिली. लोकेश राहुल आणि यशस्वी जैस्वाल या सलामी जोडीनं पहिल्या विकेटसाठी २०१ धावांची भागीदारी रचली. जी ऑस्ट्रेलियात कोणत्याही भारतीय जोडीनं केलेली सर्वोच्च भागीदारी ठरली. त्यानंतर किंग कोहलीच्या भात्यातून शतकी खेळी आली. या त्रिदेवांच्या सुपर हिट शोनंतर भारतीय संघाने दुसरा डाव ६ बाद ४८७ धावांवर घोषित करत ऑस्ट्रेलियासमोर ५३४ धावांचे मोठे टार्गेट सेट केले. दुसऱ्या डावातही हतबल ठरला कांगारूंचा संघ
भारतीय संघानं उभारलेल्या डोंगराऐवढ्या धावसंख्येचा पाठलाग करताना ऑस्ट्रेलियाची अवस्था एकदम बिकट झाली. जसप्रीत बुमराहचा भेदक मारा, त्याच ताकदीनं मोहम्मद सिराजनं त्याला दिलेली साथ आणि हर्षित राणाचं बहुमूल्य योगदानं यामुळे ऑस्ट्रेलियाचा दुसरा डावही कोलमजला. पहिल्या चार फलंदाजांना तर दुहेरी आकडाही गाठता आला नाही. ट्रॅविस हेडनं १०१ चेंडूत केलेल्या ८९ धावा, मिचेल मार्शच्या ६७ चेंडूतील ४७ धावा आणि एलेक्स कॅरीनं केलेल्या ३० धावा वगळता अन्य कोणत्याही ऑस्ट्रेलियन फलंदाजाचा भारतीय गोलंदाजीसमोर निभाव लागला नाही.