Join us

जैस्वालनं 'यशस्वी' खेळीसह साधला मोठा डाव; गंभीरचा रेकॉर्ड मोडला अन् जो रुटलाही गाठलं

पहिल्या डावात त्याला खातेही उघडता आले नव्हते, पण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 23, 2024 14:13 IST

Open in App

ऑस्ट्रेलिया दौऱ्यातील पहिल्याच कसोटी सामन्यातील पहिल्या डावात भोपळा पदरी पडलेल्या यशस्वी जैस्वालनं दुसऱ्या डावात दमदार कमबॅक करून दाखवलं. पर्थ कसोटी सामन्यातील दुसऱ्या डावात संयमी खेळी करत त्याने अर्धशतक पूर्ण करुन टीम इंडियाला सामन्यात मजबूत स्थितीत नेण्याची जबाबदारी अगदी चोख पार पाडल्याचे दिसते. पहिल्यांदाच ऑस्ट्रेलियात खेळताना गडबडल्यामुळे तो यातून सावरणार का? असा एक मोठा प्रश्न पडला होता. पण याच उत्तर युवा सलामीवीराने आपल्या बॅटनं दिले आहे.

दमदार कमबॅकसह यशस्वी जैस्वालनं साधला मोठा डाव

ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या पर्थ कसोटीतील दमदार खेळीसह यशस्वी जैस्वालनं मोठा डाव साधला आहे. कोच गौतम गंभीरचा रेकॉर्ड मोडण्यासोबतच त्याने सध्याच्या घडीला कमालीची कामगिरी करून क्रिकेट जगताला थक्क करून सोडणाऱ्या जो रुटची बरोबरी साधली आहे. जाणून घेऊयात 'यशस्वी' खेळीत दडलेल्या खास विक्रमाची गोष्ट  

आधी गंभीरचा रेकॉर्ड मोडला

युवा सलामीवीर जैस्वाल हा सातत्याने चांगली कामगरी करून दाखवण्यात यशस्वी ठरला आहे. ऑस्ट्रेलियन मैदानात त्याने गौतम गंभीरचा मोठा विक्रम मोडित काढला. यशस्वी जैस्वाल हा एका कॅलेंडर ईयरमध्ये भारताकडून सर्वाधिक धावा करणारा डावखुरा फलंदाज ठरलाय. याआधी हा विक्रम भारतीय संघाचा विद्यमान प्रशिक्षक गौतम गंभीरच्या नावे होता. २००८ या वर्षात गंभीरनं भारतीय संघाकडून सर्वाधिक ११३४ धावा केल्या होत्या. पर्थ कसोटी सामन्यात १५ धावा करताच यशस्वी कोच गंभीरच्या पुढे निघून गेला. त्यानंतर अर्धशतक पूर्ण करत त्याने जो रुटलाही गाठलं.

मग जो रुटलाही गाठलं 

वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिप स्पर्धेतील तिसऱ्या हंगामात सर्वाधिक वेळा ५० पेक्षा अधिक धावा करणाऱ्या फंलदाजांच्या यादीत यशस्वी जैस्वाल जो रुटसह संयुक्तरित्या अव्वलस्थानावर आहे. दोघांनी प्रत्येकी १२-१२ वेळा अशी कामगिरी करून दाखवलीये. या यादीत जॅक क्राउली , बेन डकेट आणि धनंजय डिसिल्वा ही मंडळी ९ या आकड्यासह टॉप ५ मध्ये आहेत. 

टॅग्स :यशस्वी जैस्वालभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाजो रूटगौतम गंभीरजागतिक कसोटी अजिंक्यपद स्पर्धा