Join us

AUS vs IND, 3rd Test Day 2 Stumps : हेड-स्मिथनं वाट लावली; बुमराहनं लाज राखली!

ऑस्ट्रेलिया संघानं दुसऱ्या दिवसाच्या अखेरीस धावफलकावर ७ बाद ४०५ धावा लावल्या आहेत.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 15, 2024 14:37 IST

Open in App

Australia vs India, 3rd Test Day 2 Stumps : ब्रिस्बेन येथील गाबा कसोटीच्या दुसऱ्या दिवशी पहिल्या अर्ध्या तासांचा खेळ अन् दिवसाअखेरच्या तासभरात जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीत दिसलेली जादू सोडली तर अख्खा दिवस ऑस्ट्रेलियाच्या ट्रॅविस हेड आणि स्मित या जोडीनं गाजवला. दोघांनी केलेल्या शतकी खेळीच्या जोरावर यजमान संघाने तिसऱ्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवसअखेर संघाच्या धावफलकावर ७ बाद ४०५ धावा लावल्या आहेत.   

 हेड अन् स्मिथ जोडीनं वाट लावली

तिसऱ्या कसोटी सामन्यात ट्रॅविस हेड आणि स्मिथ जोडी जमल्यावर भारतीय गोलंदाजी खूपच कमकूवत दिसली. बुमराह चालला तर ठीक नाहीतर गडबड घोटाळा असाच काहीसा सीन होता. ७५ धावांवर ऑस्ट्रेलियाच्या संघाने ३ विकेट्स गमावल्या होत्या. पण त्यानंतर स्टीव्ह स्मिथ आणि ट्रॅविस हेड या जोडीनं चौथ्या विकेटसाठी २४१ धावांची दमदार भागीदारी रचली. ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावात ट्रॅविस हेडनं सर्वाधिक १५२ धावांची खेळी केली. दुसरीकडे स्टीव्ह स्मिथनं १०१ धावांची दमदार खेळी केली.

रोहितची कॅप्टन्सीही ठरली कुचकामी  

या दोघांना आउट करण्यासाठी कोणत्या गोलंदाजाचा कसा वापर करावा, फिल्ड सेटअप कसे करावे? याबाबतीत रोहित शर्मा बॅकफूटवरच दिसला. त्याने हेडचा एक कॅचही सोडला. ऑस्ट्रेलियन शतकवीरांच्या दमदार खेळीमुळं हिटमॅनच्या कॅप्टन्सीवरही प्रश्नचिन्ह उपस्थितीत होत आहे.  

शेवटी जसप्रीत बुमराह मदतीला धावला, त्याने थोडी लाज राखली!

ऑस्ट्रेलियाच्या सेट झालेली जोडी फोडण्यासाठी पुन्हा बुमराहलाच पुढे यावे लागले. त्याने आधी स्मिथला चालते केले. मग ट्रॅविस हेडलाही त्याने आपल्या जाळ्यात अडकवले.  मिचेल मार्शही त्याच्या जाळ्यात फसला. दिवसाअखेरच्या शेवटच्या सत्रात बुमराहनं भेदक मारा करत टीम इंडियाची लाजच राखली. या विकेट्स हाती लागल्या नसत्या तर टीम इंडियाची अवस्था खूपच बिकट झाल्याचे पाहायला मिळाले असते. 

कांगारुंचं शेपूट गुंडाळायला भारतीय गोलंदाज किती वेळ घेणार? 

ऑस्ट्रेलियन कॅप्टन पॅट कमिन्स याने (२०) एलेक्स कॅरीच्या साथीनं ५७ धावांची भागीदारी केली. कमिन्सच्या रुपात सिराजनं या सामन्यात आपली पहिली विकेट घेतली.  एलेक्स कॅरी ४७ धावा करून नाबाद परतला असून मिचेल स्टार्कच्या साथीनं त्याने नाबाद २० धावांची भागीदारी रचली आहे. तिसऱ्या दिवसाच्या खेळात लवकरात लवकर  तीन विकेट्स घेत भारतीय संघ बॅटिंगला येणार की, कांगारूंची शेपूटही वळवळणार? ते पाहण्याजोगे असेल. 

 

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघभारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाजसप्रित बुमराहरोहित शर्मास्टीव्हन स्मिथ