AUS vs IND, 3rd Test Jasprit Bumrah Strikes Early Usman Khawaja And Nathan McSweeney Loss Wicket : ब्रिस्बेन येथील गाबा स्टेडियमवर सुरु असलेल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळावर पावसाच्या व्यत्ययामुळे पाणी फेरल्यामुळे बदललेल्या नव्या वेळानुसार ५ वाजून २० मिनिटांनी दुसऱ्या दिवसाच्या खेळाला सुरुवात झाली. नॅथन मॅकस्विनी आणि उस्मान ख्वाजा या जोडीनं बिन बाद २८ धावांवर खेळाला सुरुवात केली.
बुमराहचा भेदक मारा; बॅक टू बॅक ओव्हरमध्ये दोन्ही सलामीवीरांना धाडले तंबूत
जसप्रीत बुमराहनं अवघ्या काही वेळातच टीम इंडियाला पहिलं यश मिळवून दिलं. अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत त्याने ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजाला तंबूचा रस्ता दाखवला. ऑस्ट्रेलियानं ३१ धावांवर आपली पहिली विकेट गमावली. ऑस्ट्रेलियाच्या डावातील १७ व्या षटकातील पहिल्याच चेंडूवर बुमराहनं सलामीवीर ख्वाजाला पंतकरवी झेलबाद गेले. हे षटक निर्धावही टाकले. १९ व्या षटकात बुमराह पुन्हा गोलंदाजीला आला अन् त्याने दुसऱ्या सलामीवीरालाही तंबूचा रस्ता दाखवला. नॅथन मॅकस्विनी (Nathan McSweeney) च्या रुपात ऑस्ट्रेलियाला ३८ धावांवर हा दुसरा धक्का बसला. स्लिपमध्ये विराट कोहलीनं त्याचा झेल टिपला. उस्मान ख्वाजानं ५४ चेंडूत ३ चौकाराच्या मदतीने २१ धावा केल्या. तर नॅथन मॅकस्विनी याने ४९ चेंडूत एका चौकारासह फक्त ९ धावा केल्या.
बुमराहच्या यशात आकाश दीपनंही उचलला मोलाचा वाटा
भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा कसोटी सामना ब्रिस्बेनच्या गाबा मैदानात खेळवण्यात येत आहे. पहिल्या दिवशी फक्त १३.२ षटकांचा खेळ झाला. पहिल्यांदा गोलंदाजी करताना टीम इंडियाला सुरुवातीला एकही विकेट मिळाली नाही. जसप्रीत बुमराह चेंडू स्विंग होईना, असं म्हणत वैतागल्याचेही दिसले. पण दुसऱ्या दिवशी मात्र स्टार गोलंदाजानं टीम इंडियानं दमदार सुरुवात करत भारतीय क्रिकेट चाहत्यांची सकाळ एकदम मस्त केलीये. बुमराहनं सलामीवीरांना अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत परफेक्ट सेटअपसह आपल्या जाळ्यात अडकवलं. याशिवाय दुसऱ्या बाजूनं आकाश दीपनं उत्तम गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला धक्क्यावर धक्के देण्यात मोलाची कामगिरी बजावली.