ब्रिस्बेन येथील गाबाच्या स्टेडियमवर भारतीय संघ पुन्हा एकदा ऑस्ट्र्लिलाया 'घमंड' मोडून मालिकेत १-० आघाडी घेईल, या आशेनं बहुतांश भारतीय क्रिकेट चाहते सकाळी लवकर उठून टेलिव्हिजनसमोर बसले आहेत. पण पावसाच्या व्यत्ययामुळे चाहत्यांना आनंदावरच पाणी फिरल्याचे चित्र दिसत आहे. भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसऱ्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवसाच्या खेळातील १३. २ षटकांच्या खेळात दोन वेळा रेन ब्रेकची वेळ आल्याचे पाहायला मिळाले. टॉस जिंकून पहिल्यांदा बॉलिंगचा निर्णय घेतलेला भारतीय संघ अजूनही पहिल्या विकेट्सच्या प्रतिक्षेत आहे. दुसरीकडे ऑस्ट्रेलियाच्या संघाच्या सलामी जोडीनं संयमी खेळ दाखवत धावफलकावर २८ धावा लावल्या आहेत.
सहाव्या षटकात पावसाचा व्यत्यय
ब्रिस्बेनच्या गाबा स्टेडियमवर नाणेफेकीनंतर ढगाळ वातावरणात अगदी ठरलेल्या वेळेत सामन्याला सुरुवात झाली. या परिस्थितीची फायदा घेत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीला सुरुंग लावण्याच्या इराद्याने टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्मानं गोलंदाजीचा निर्णय घेतला. पण ५.३ षटकानंतर रिमझिम पावसामुळे खेळ थांबवण्याची वेळ आली. जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी या स्पेलमध्ये खूपच मागे गोलंदाजी केली. परिणामी टीम इंडियाला सुरुवातीला अपेक्षित रिझल्ट मिळाला नाही.
मी पुन्हा येईन शो! ४७ चेंडूंच्या खेळानंतर पावसानं पुन्हा सुरु केली बॅटिंग
या ब्रेकनंतर सामना पुन्हा सुरु झाला. दुसऱ्या ब्रेकआधी भारतीय संघाच्या गोलंदाजांना विकेट मिळाली नसली तरी अचूक टप्प्यावर गोलंदाजी करत ऑस्ट्रेलियाच्या धावसंख्येलाही लगाम घालण्यात भारतीय गोलंदाज यशस्वी ठरले आहेत. हा माहोल टीम इंडियाला यश मिळवून देईल, असे वाटत असताना पुन्हा पावसाला सुरुवात झाली. ही गोष्ट ऑस्ट्रेलियन सलामीवीर उस्मान ख्वाजा आणि नॅथन मॅकस्विनी यांच्यासाठी थोडा दिलासा देणारा असाच होता. कारण हे दोघेही फलंदाजी करताना संघर्ष करताना दिसत होते.
पावसाचे सावट
- हवामान खात्याने गाबा येथे पावसासह वादळी वाऱ्याचा अंदाज वर्तविला आहे.
- हवामान खात्याच्या अंदाजानुसार पहिल्या दिवशी (शनिवारी) ८८ टक्के वादळी वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे.
- रविवारी ५८ टक्के आणि सोमवारी ६० टक्के पाऊस पडण्याची शक्यता आहे. मंगळवारी ५५ टक्के तर पाचव्या दिवशी १ टक्के पावसाची शक्यता आहे.
Web Title: Australia vs India 3rd Test Rain stops play At The Gabba Brisbane
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.