Rishabh Pant Most Test Dismissals : ब्रिस्बेन येथील गाबाच्या मैदानात रंगलेल्या ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या तिसऱ्या कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवसाचा खेळ ठरलेल्या वेळेत सुरु झाला. पहिल्या दिवशी पावसाच्या व्यत्ययामुळे फक्त ८० चेंडूचाच खेळ झाला होता. दुसऱ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराहनं संघाला दमदार सुरुवात करुन दिली. पहिल्या अर्ध्या तासाच्या खेळातच त्याने ऑस्ट्रेलियाच्या दोन्ही सलामीवीरांना तंबूचा रस्ता दाखवला. यादरम्यान विकेट मागे रिषभ पंतनं खास कामगिरी नोंदवली आहे.
ख्वाजाचा कॅच घेताच पंतच्या नावे झाला खास रेकॉर्ड
जसप्रीत बुमराहच्या गोलंदाजीवर उस्मान ख्वाजाचा कॅच घेताच रिषभ पंत कसोटी क्रिकेटमध्ये सर्वाधिक 'शिकार' करणारा तिसरा भारतीय 'शिकारी' ठरला आहे. उस्मान ख्वाजाच्या रुपात पंतनं विकेटमागे १५० गड्यांना तंबूचा रस्ता दाखवण्याचा पल्ला गाठला. त्याने ४१ व्या कसोटी सामन्यात हा पल्ला गाठला आहे. भारताकडून विकेटमागे सर्वाधिक बळी टिपण्याचा विक्रम हा महेंद्रसिंह धोनीच्या नावे आहे. याशिवाय यादीत वर्ल्ड चॅम्पियन माजी क्रिकेटर सय्यद किरमानी हे देखील पंतच्या पुढे आहेत.
भारताकडून विकेटमागे सर्वोत्तम कामगिरी करणाऱ्या विकेट किपरच्या यादीत धोनी टॉपर
पंतनं कसोटी कारकिर्दीत आतापर्यंत खेळलेल्या ४१ सामन्यात १३५ स्टंपिंग आणि १५ झेल घेतले आहेत. या यादीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या सय्यद किरमानी यांनी १९८ फलंदाजांना तंबूचा रस्ता दाखवताना १६० झेल आणि ३८ फलंदाजांना यष्टीचित केले आहे. महेंद्रसिंह धोनीनं कसोटी कारकिर्दीत ९० सामन्यात २९४ विकेट्स घेतल्या असून यात २५६ झेल आणि ३८ स्टंपिंग केल्या आहेत.
भारतीय विकेट किपर अन् त्यांची टेस्टमधील कामगिरी
- महेंद्रसिंह धोनी (२००५-२०१४)-९० सामन्यात २५६ कॅचेस अन् ३८ स्टम्पिंग
- सय्यद किरमानी (१९७६-१९८६)- ८८ सामन्यात १६० कॅचेस अन् ३८ स्टम्पिंग
- रिषभ पंत (२०१८ पासून आतापर्यंत) - ४१ सामन्यात १३५ कॅचेस अन् १५ स्टम्पिंग
- किरण मोरे (१९८६-१९९३)० ४९ सामन्यात ११० कॅचेस अन् २० स्टम्पिंग
- नयन मोंगिया (१९९४-२००१) -४४ सामन्यात ९९ कॅचेस अन् ८ स्टम्पिंग