Join us

पाचव्या दिवशी ३३३ प्लस टार्गेट पार करणं टीम इंडियाला शक्य होईल? इथं पहा आधीचा रेकॉर्ड

पाचव्या आणि अखेरच्या दिवशी टीम इंडियाला ३३३ धावांपेक्षा अधिक टार्गेट मिळणार हे स्पष्ट झाले आहे. 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 29, 2024 15:21 IST

Open in App

Australia vs India 4th Test At Melbourne : मेलबर्नच्या मैदानातील बॉक्सिंग डे कसोटी सामन्याच्या चौथ्या दिवशी बुमराह-सिराज यांनी दमदार गोलंदाजी करत यजमान ऑस्ट्रेलियाच्या फलंदाजीला सुरुंग लावला. पण शेवटच्या जोडीनं चिवट फलंदाजी करत सामन्यात पुन्हा ट्विस्ट आणलं. लायन आणि बोलँड यांनी केलेल्या अर्धशतकी खेळीच्या जोरावर ऑस्ट्रेलियानं चौथ्या दिवसाअखेर ३३३ धावांची आघाडी घेतली. त्यामुळे पाचव्या आणि अखेरच्या दिवशी टीम इंडियाला ३३३ धावांपेक्षा अधिक टार्गेट मिळणार हे स्पष्ट झाले आहे. 

पाचव्या दिवशी सामना निकाली लागणार की,....

आता मुद्दा हा की, मेलबर्नच्या मैदानात शेवटच्या दिवशी हे टार्गेट पार करून टीम इंडिया बाजी मारणार? ऑस्ट्रेलिया संघाला रोखून गड राखणार की, सामना अनिर्णित राहणार असा प्रश्न क्रिकेट चाहत्यांना पडला आहे. चौथ्या दिवशी खेळ जिथं थांबला ते पाहता तिन्ही शक्यता नाकारता येत नाहीत. पण इथं आपण टीम इंडियाला ते शक्य आहे का? ते मागील रेकॉर्ड्सच्या आधारे समजून घेण्याचा प्रयत्न करुयात.

धावांचा पाठलाग करताना टीम इंडियाची ऑस्ट्रेलिया विरुद्धची सर्वोच्च कामगिरी 

भारतीय संघानं कसोटी क्रिकेटच्या इतिहासात आतापर्यंत तीन वेळा ३३० पेक्षा अधिक धावांचे टार्गेट पार करून दाखवलं आहे. हा रेकॉर्ड टीम इंडिया अजूनही मेलबर्नचे मैदान मारू शकते, याची आस पुन्हा निर्माण करणारा आहे. याआधी २०२१ मध्ये भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाविरुद्ध ३२८ धावांचा पाठलाग करताना विजय मिळवत इतिहास रचला होता. 

टीम इंडियानं ३ वेळा केलाय ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग

भारतीय संघाने तीन वेळा ३०० पेक्षा अधिक धावांचा यशस्वी पाठलाग करून दाखवला आहे. यात दोन वेळा टीम इंडियानं परेदशी मैदानात बाजी मारली आहे. १९७६ मध्ये टीम इंडियानं वेस्ट इंडिज विरुद्ध ४०३ धावांचा पाठलाग यशस्वीरित्या करून दाखवला होता. २००९ मध्ये इंग्लंड विरुद्ध ३८७ धावांचा पाठलाग करत टीम इंडियाने विजय मिळवल्याचा रेकॉर्ड आहे. २०२१ मध्ये ब्रिस्बेनच्या मैदानात केलेल्या ३२८ धावांशिवाय  दिल्लीच्या मैदानात वेस्ट इंडिज विरुद्ध भारतीय संघानं २७६ धावांचा यशस्वी पाठलाग केल्याचा रेकॉर्ड आहे. 

पाचव्या दिवशी टीम इंडियाचा अप्रोच काय असणार?

पाचव्या दिवशी जास्तीत जास्त ९८ षटकांचा खेळ होईल. यात लवकरात लवकर ऑस्ट्रेलियन संघाची अखेरची जोडी फोडण्याचं चॅलेंज टीम इंडियासमोर असेल. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या मालिकेत पर्थच्या मैदानातील कामगिरी सोडली तर भारतीय फलंदाजांना धमक दाखवता आलेली नाही. ही उणीव भरून काढण्याची टीम इंडियाला संधी असेल.  सामना जिंकायचा असेल तर फलंदाजांना धावगतीवर फोकस करावा लागेल. धावगतीच्या नादात झटपट विकेट जाणार नाहीत, याचीही खबरदारी टीम इंडियाला घ्यावी लागेल. पहिल्या सत्राच्या खेळात दोन्ही संघाचा अप्रोच काय अन् सामना कुणाच्या बाजूनं फिरणार त्याचा अंदाज येईल.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघआॅस्ट्रेलियाजसप्रित बुमराहमोहम्मद सिराजरोहित शर्माविराट कोहलीयशस्वी जैस्वाल