Join us

AUS vs IND, 4th Test Day 2 Stumps : १६४ धावांत टीम इंडियाचा अर्धा संघ तंबूत, पंत-जड्डूवर आस

रिषभ पंत ६ (७) तर रवींद्र जडेजा ४ (७) धावांवर खेळत असून तिसऱ्या दिवशी या जोडीकडून दमदार भागीदारीची अपेक्षा आहे.

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2024 13:12 IST

Open in App

Australia vs India, 4th Test Day 2 : मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातील दुसऱ्या दिवशी विराट कोहली- यशस्वी जैस्वाल यांच्या शतकी भागीदारीनं टीम इंडियासाठी मोठी आस निर्माण केली होती. पण दिवसअखेरची काही षटके बाकी असताना दोघेही तंबूत परतली अन् दुसरा दिवसाचा खेळही ऑस्ट्रेलियाच्या बाजूनं गेला. दुसऱ्या दिवसाअखेर भारतीय संघानं ५ विकेट्सच्या मोबदल्यात १६४ धावा केल्या असून टीम इंडिया अजूनही ३१० धावांनी पिछाडीवर आहे. रिषभ पंत ६ (७) तर रवींद्र जडेजा ४ (७) धावांवर खेळत असून तिसऱ्या दिवशी या जोडीकडून दमदार भागीदारीची अपेक्षा आहे.

ओपनिंगचा प्रयोग ठरला फोल

बॉक्सिंग डे कसोटीच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ४७४ धावांवर आटोपल्यावर भारतीय संघानं आपल्या पहिल्या डावाची सुरुवात केली. रोहित शर्मा आणि यशस्वी जैस्वाल यांचा बदललेला प्रयोग अपय़शी ठरला. संघाच्या धावफलकावर अवघ्या ८ धावा असताना रोहित ३ धावा करून माघारी फिरला. पहिली विकेट गमावल्यावर लोकेश राहुल बॅटिंगला आला. त्याने यशस्वी जैस्वालच्या साथीनं दुसऱ्या विकेटसाठी ४३ धावांची भागीदारी रचली. पहिल्या दोन्ही विकेट्स पॅट कमिन्सनं घेतल्या. 

विराट कोहली-यशस्वी जैस्वाल यांच्यात शतकी भागादारी

पहिल्या धक्क्यातून सावरत यशस्वी जैस्वाल आणि विराट कोहलीनं संघाचा डाव सावरला. या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी १०२ धावांची दमदार भागीदारी रचली. या जोडीसमोर ऑस्ट्रेलियन गोलंदाजांनी अक्षरश: खांदे टाकले होते. पण दोघांच्यातील ताळमेळ ढासळला अन् भारताच्या डावातील ४१ व्या षटकात यशस्वी जैस्वाल रन आउट झाला. त्याने ११८ चेंडूचा सामना करताना ८२ धावांची खेळी केली. 

दिवसाच्या अखेरच्या षटकात धक्क्यावर धक्के

यशस्वी जैस्वाल बाद झाल्यावर विराट कोहलीही ८६ चेंडूत ३६ धावा करून माघारी फिरला. नाईट वॉचमनच्या रुपात आलेल्या आकाशदीपलाही खाते उघडता आले नाही. परिणामी दिवसाअखेर भारतीय संघाचा अर्धा संघ अवघ्या १६४ धावांत तंबूत परतला होता.

टॅग्स :भारतीय क्रिकेट संघयशस्वी जैस्वालरिषभ पंतरवींद्र जडेजा