Australia vs India 4th Test Day 5 : बॉर्डर-गावसकर ट्रॉफी स्पर्धेतील पाचव्या आणि निर्णायक दिवसाच्या खेळातील पहिल्या सत्रातील दुसऱ्याच षटकात भारतीय संघानं ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांत आटोपला. नॅथन लायन ४१ (५५) आणि स्कॉट बोलँंड १५ (७४) या जोडीनं अखेरच्या विकेटसाठी केलेल्या दमदार भागीदारीच्या जोरावर यजमान संघाने पाहुण्यासंघासमोर धावांचे टार्गेट सेट केले आहे. बुमराहनं नॅथनला त्रिफळाचित करत ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव खल्लास केला.
टीम इंडियासमोर ३४० धावांचे टार्गेट
चौथ्या दिवसाच्या खेळात जसप्रीत बुमराह आणि मोहम्मद सिराज यांनी भेदक मारा करत ऑस्ट्रेलियाच्या आघाडीच्या फलंदाजीला सुरुंग लावला होता. पण शेवटी कांगारुंच्या शेपटीनं दमवलं. चौथ्या दिवसाअखेर अर्धशतकी भागीदारी करणाऱ्या नॅथन लायन आणि स्कॉट बोलँड यांनी ९ बाद २२८ धावांवरुन पाचव्या दिवसाच्या खेळाला सुरुवात केली. दुसरीकडे भारताकडून मोहम्मद सिराजनं बॉलिंगची सुरुवात केल्याचे पाहायला मिळाले. सिराजनं आपल्या या षटकात ५ धावा दिल्या. त्यानंतर बुमराह गोलंदाजीला आला. नॅथन लायनला बोल्ड करत त्याने ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव २३४ धावांवर आटोपला. ही बुमराहची पाचवी विकेट ठरली. पहिल्या डावातील १०५ धावांची आघाडीसह ऑस्ट्रेलियन संघानं पाचव्या आणि अखेरच्या दिवशी टीम इंडियासमोर ३४० धावांचे टार्गेट सेट केले आहे.
९ चेंडूत ऑस्ट्रेलियाला केलं 'ऑल आउट'
पाचव्या दिवसाच्या खेळात सिराजनं आपल्या पहिल्या षटाकात ५ धावा खर्च केल्या. यात बोलँडनं मारलेला चौकार आणि एक लेग बाइजच्या रुपात मिळालेली एक धाव याचा समावेश होता. पाचव्या दिवसाच्या खेळातील दुसऱ्या षटकात जसप्रीत बुमराहचे दोन चेंडू निर्धाव खेळल्यावर बोलँडनं सिंग घेत स्ट्राइक नॅथन लायनला दिलं. बुमराहच्या पाचव्या दिवसाच्या खेळातील पहिल्याच चेंडूवर लायन बोल्ड झाला. त्याने ५५ चेंडूत ४ चौकाराच्या मदतीने ४१ धावांचे बहुमूल्य योगदान दिले. दुसऱ्या बाजूला बोलँड ७४ चेंडूचा सामना करून २ चौकारांसह १५ धावांवर नाबाद राहिला. भारतीय संघाला जवळपास ९२ षटकांच्या खेळात ३४० धावा करायच्या आहेत.