भारत-ऑस्ट्रेलिया यांच्यातील चौथा कसोटी सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर खेळवण्यात येत आहे. पॅट कमिन्सनं मालिकेत पहिल्यांदाच टॉस जिंकून बॅटिंग करण्याचा निर्णय घेतला. पहिल्या दिवसाच्या खेळात ऑस्ट्रेलियन आघाडीच्या फलंदाजांनी दमदार कामगिरी केली. ऑस्ट्रेलियन फलंदाजांच्या विकेट्स मिळवण्यासाठी गोलंदाजांसह कॅप्टन रोहित शर्मा वेगवेगळ्या रणनिती आखताना दिसून आले. दरम्यान पहिल्या दिवसाच्या खेळात रोहित शर्मा यशस्वीला ओरडतानाही दिसून आले. हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
नेमकं काय घडलं? रोहित युवा जैस्वालला का ओरडला?
रवींद्र जडेजा गोलंदाजी करत असताना स्टीव्ह स्मिथनं एक चेंडू कव्हरच्या दिशेनं खेळून काढला. यावेळी यशस्वी जैस्वाल सिली पाइंट पोझीशनवर फिल्डिंगला उभा होता. क्लोज फिल्डिंगवेळी जो नियम पाळावा लागतो तोच तो विसरल्याचे दिसले. त्यामुळेच रोहित शर्मा त्याच्यावर ओरडताना दिसून आले. आरे जस्सू गल्ली क्रिकेट खेल रहा है क्या? (गल्ली क्रिकेट खेळतोयस का?) जोपर्यंत फलंदाज चेंडू खेळत नाही तोपर्यंत उठून उभा राहयचं नाही, अशी सूचना वजा ताकीदच त्याने युवा यशस्वी जैस्वालला दिला. मैदानातील घडलेला हा सर्व प्रकार कॅमेऱ्यात कैद झाला असून सोशल मीडियावर हा व्हिडिओ चर्चेत आला आहे.
क्लोज फिल्डिंगचा एक नियम असतो, तो नियमच यशस्वी विसरला अन् ओरडा खाल्ला
क्रिकेटच्या मैदानात क्लोज फिल्डिंग करत असताना खेळाडूनं अलर्ट मोडमध्ये राहणे अपेक्षित असते. अनेकदा आपल्याला खेळाडू गुडघ्यावर हात ठेवून अगदी वाकून उभा असल्याचे दिसते. काही वेळा फिल्डर पायच्या पंजाच्या आधारे क्लोज फिल्डिंग करताना दिसून येते. क्लोज फिल्ड पोझिशनवर फिल्डिंग करताना कधीच उभे राहयचे नसते. हा क्रिकेटचा एक बेसिक रूल आहे. तो न पाळल्यामुळेच रोहित यशस्वीला गल्ली क्रिकेट खेळतोयस का? असा प्रश्न विचारत नीट लक्ष देऊन फिल्डिंग कर, असा सल्ला देताना दिसून आले.