Sam Konstas Records Debuts : सॅम कोन्स्टास याने मेलबर्न बॉक्सिंग डे कसोटी सामन्यातून अगदी धमाक्यात पदार्पण केले आहे. आंतरराष्ट्रीय कारकिर्दीतील पहिल्या डावात त्याने ६० धावांची दमदार खेळी करत भारतीय गोलंदाजांचे खांदे पाडले. या खेळीसह त्याने खास विक्रमाला गवसणी घातली आहे. ऑस्ट्रेलियन संघानं नॅथन मॅक्सविनीला बाहेरचा रस्ता दाखवत जलदगतीने धावा करण्याची क्षमता असणाऱ्या १९ वर्षीय पोराला प्लेइंग इलेव्हनमध्ये स्थान दिले. पहिल्याच सामन्यात तुफान फटकेबाजीचा नजणारा पेश करत त्याने संघ व्यवस्थापनाचा निर्णय सार्थ ठरवला.
ऑस्ट्रेलियाकडून कसोटी खेळणारा चौथा युवा क्रिकेटर ठरला सॅम
सॅम कोन्स्टास हा ऑस्ट्रेलियाकडून कसोटी सामना खेळणारा चौथा सर्वात युवा क्रिकेटर ठरला आहे. ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी वयात कसोटी खेळण्याचा विक्रम हा इयान क्रेग या दिग्गजाच्या नावे आहे. १९५३ मध्ये १७ वर्ष २२९ दिवस वय असताना या क्रिकेटरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्ध मेलबर्नच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळला होता. ऑस्ट्रेलियाचा विद्यमान कॅप्टन पॅट कमिन्स याने २०११ मध्ये जोहान्सबर्घच्या मैदानात पदार्पणाचा सामना खेळला होता. १८ वर्षे १९३ दिवस वय असताना तो दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात मैदानात उतरला होता. टॉम गेरेट या दिग्गजानं १८७७ मध्ये मेलबर्नच्या मैदानात १८ वर्षे २३२ दिवस वय असताना पदार्पणाचा सामना खेळला होता. या यादीत आता १९ वर्षे ८५ दिवस वयासह सॅमची एन्ट्री झाली आहे. बॉक्सिंग डे टेस्टमध्ये पदार्पणात अर्धशतकी खेळीसह खास क्लबमध्ये मारली एन्ट्री
ऑस्ट्रेलियाकडून बॉक्सिंग डेच्या दिवशी सॅम कोन्स्टासला आंतरारष्ट्रीय पदार्पणाची संधी मिळाली. या संधीच सोन करताना त्याने अर्धशतकी खेळी केली. बॉक्सिंग डे कसोटी सामन्यात पदार्पणात अर्धशतक करणारा तौ चौथा सलामीवीर ठरला. याआधी वेस्टइंडिजचा रॉय फ्रेडरिक्स, भारताचा मयंक अग्रवाल आणि ऑस्ट्रेलियाच्या एड कोवन यांचा सामावेश आहे. फ्रेडरिक्सनं १९६८ मध्ये ऑस्ट्रेलिया विरुद्ध ७६ धावांची खेळी केली होती. मयंक अग्रवालनं २०१८ मध्ये ७६ धावांची खेळी साकारली होती. कोवन याने २०११ मध्ये ६८ धावांची खेळी केली होती.
टेस्टमध्ये ऑस्ट्रेलियाकडून अर्धशतकी खेळी करणारा युवा क्रिकेटर
टेस्ट क्रिकेटमध्ये सॅमनं ऑस्ट्रेलियाकडून सर्वात कमी वयात अर्धशतक झळकवण्याचा खास विक्रमही आपल्या नावे केला. त्याने १९ वर्षे आणि ८५ वयात ६० धावांची खेळी करत त्याने नील हार्वे आणि आर्ची जॅकसन यांचा रेकॉर्ड मागे टाकला. या यादीत इयान क्रेग हा दिग्गज टॉपला आहे. १९५३ मध्ये या ऑस्ट्रेलियन क्रिकेटरनं दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या कसोटी सामन्यात १७ वर्षे २४० दिवस वय असताना अर्धशतक झळकावले होते.