Australia vs New Zealand 1st Test: ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड यांच्यात कसोटी सामना खेळवला जात आहे. सलामीच्या या सामन्यात एक नाट्यमय घडामोड घडली. खरं तर झालं असं की, न्यूझीलंडचा स्टार खेळाडू केन विल्यमसन धाव काढताना दुसऱ्या टोकाला असलेल्या आपल्या सहकारी खेळाडूला धडकला अन् त्याला आपली विकेट गमवावी लागली. किवी संघाच्या पहिल्या डावात विल्यमसनला खातेही उघडता आले नाही आणि तो धावबाद झाला. विल्यमसन कसोटीत धावबाद होण्याची १२ वर्षांतील ही पहिलीच वेळ आहे.
या सामन्यात त्याचा सहकारी विल यंग याच्यासोबत धाव घेत असताना त्याला चांगला ताळमेळ राखता आला नाही आणि दोघेही खेळपट्टीवर एकमेकांना भिडले. त्यामुळे विल्यमसन वेळेत दुसऱ्या टोकापर्यंत पोहोचू शकला नाही आणि तो धावबाद झाला. हा व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. विल्यमसन शेवटच्या वेळी २०१२ मध्ये कसोटीत धावबाद झाला होता.
केन विल्यमसन सध्या जबरदस्त फॉर्ममध्ये आहे. मागील ७ कसोटी सामन्यांमध्ये विल्यमसनने ७ शतकं झळकावण्याचा चमत्कार केला आहे. आतापर्यंतच्या कारकिर्दीत विल्यमसनने ३२ शतकं झळकावण्यात यश मिळवलं आहे. सक्रिय खेळाडूंमध्ये विल्यमसन सर्वाधिक शतकं झळकावण्याच्या बाबतीत पाचव्या स्थानावर आहे. विल्यमसननं आतापर्यंत आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये एकूण ४५ शतकं झळकावण्याची किमया साधली आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव ३८६ धावांवर संपला. कॅमेरून ग्रीनने सर्वाधिक १७४ धावांची नाबाद खेळी केली, ग्रीनने जोश हेझलवुडसोबत शेवटच्या बळीसाठी ११६ धावा जोडल्या, जी धावसंख्या न्यूझीलंडविरुद्ध कसोटीत १०व्या बळीसाठी ऑस्ट्रेलियाच्या सर्वात मोठ्या भागीदारीचा विक्रम आहे. शेवटचा फलंदाज म्हणून हेझलवुड २८ धावा करून बाद झाला.