Join us  

क्लीन बोल्ड! Adam Zampa नं सेट झालेल्या Babar Azam ला टेकायला लावले गुडघे

बाबर आझम सध्या धावांसाठी संघर्ष करताना दिसतोय. ऑस्ट्रेलियातही हा संघर्ष कायम

By ऑनलाइन लोकमत | Published: November 04, 2024 2:34 PM

Open in App

Adam Zampa Clean Bowls Babar Azam : पाकिस्तान आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील ३ सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना मेलबर्न क्रिकेट ग्राउंडवर रंगला आहे. या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने नाणेफेक जिंकत पहिल्यांदा गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतल्याचे पाहायला मिळाले. पहिल्यांदा फलंदाजी करताना पाकिस्तानचा संघ निर्धारित ५० षटकेही खेळू शकला नाही. ४६.४ षटकात पाक संघानं २०३ धावांपर्यंत मजल मारली. सलामी जोडीच्या फ्लॉप शोनंतर नवा कर्णधार मोहम्मद रिझवान आणि माजी कर्णधार बाबर आझम या दोघांनी तिसऱ्या विकेटसाठी ३९ धावांची भागीदारी रचली. 

बाबर सेट झाला, पण पुन्हा अर्धशतकाशिवाय परतला

बाबर आझम ११ महिन्यानंतर वनडे सामना खेळण्यासाठी मैदानात उतरला होता. तो लयीतही दिसला. पण अ‍ॅडम झम्पा आला अन् त्यानं बाबरचा सेट झालेला डाव मोडला. ४४ चेंडूत ३७ धावा करून बाबरला तंबूत परतण्याची वेळ आली. पुन्हा एकदा बाबर आझम अर्धशतकी खेळीच्या जवळ येऊन अडखळल्याचे दिसून आले. झम्पाच्या गोलंदाजीवर तो क्लीन बोल्ड झाला.

झम्पानं असा दिला चकवा 

पाकिस्तानच्या डावातील १८ व्या षटकात  अ‍ॅडम झम्पानं टाकलेला चेंडू बाबरला कळलाच नाही. लेग स्पिनरनं टाकलेला चेंडू टप्पा पडल्यावर बाहेरच्या बाजूला वळेल, असे समजून बाबर हा चेंडू खेळण्यासाठी बॅकफूटवर गेला. पण चेंडू एकदम सरळ रेषेत राहिला अन् बाबरनं बॅट आडवी घालण्याआधी त्याचा त्रिफळा उडला. झम्पानं आपल्या पहिल्याच ओव्हरमध्ये बाबरचा खेळ खल्लास केला. 

बाबरवर ५ वर्षांत पहिल्यांदाच आली ही वेळ!

जवळपास ५ वर्षांत पहिल्यांदाच बाबर आझमवर वनडेत फिरकीपटूच्या गोलंदाजीवर बोल्ड होण्याची वेळ आली. बाबर आझम हा सध्या बॅड पॅचचा सामना करत आहे. इंग्लंड विरुद्धच्या घरच्या मैदानातील २ कसोटी सामन्यात त्याला संघात स्थानही मिळाले नव्हते. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या वनडेतून त्याने पुन्हा एकदा संघात एन्ट्री मारली. पण छाप सोडायला तो पुन्हा कमी पडला. २०२३ च्या वर्ल्ड कप स्पर्धेनंतर पाकिस्तानचा संघ पहिली वनडे मालिका खेळत आहे. वनडे वर्ल्ड कप स्पर्धेतील पराभवानंतर बाबर आझमनं पाकिस्तान संघाची कॅप्टन्सी सोडली होती. पुन्हा तो काही काळासाठी निर्णय बदलून पाक संघाचे नेतृत्व करताना दिसला आणि पुन्हा या जबाबदारीतून मोकळा झाला आहे. आता  तो मोहम्मद रिझवानच्या नेतृत्वाखाली खेळताना दिसतोय. 

टॅग्स :बाबर आजमपाकिस्तानआॅस्ट्रेलिया