AUS vs PAK Test 2023 । पर्थ : बलाढ्य ऑस्ट्रेलियाने आपला विजयरथ कायम ठेवत पाकिस्तानचा पहिल्या कसोटी सामन्यात दारूण पराभव केला. खरं तर पाकिस्तानचा ऑस्ट्रेलियात २४ वर्षांचा पराभवाचा सिलसिला सुरूच आहे. सलामीच्या सामन्यात यजमान ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना यजमानांनी पहिल्या डावात ४८७ धावा केल्या. प्रत्युत्तरात पाकिस्तानचा पहिला डाव २७१ धावांवर आटोपला. अशा प्रकारे ऑस्ट्रेलियन संघाला २१६ धावांची आघाडी मिळाली. कांगारूंनी पाकिस्तानला फॉलोऑन होऊ दिले नाही आणि दुसऱ्या डावात स्वतः फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला.
पर्थ येथे खेळल्या गेलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानचा ३६० धावांनी पराभव केला. आज रविवारी सामन्याच्या चौथ्या दिवशीच पाकिस्तानचा पराभव करण्यात ऑस्ट्रेलियाला यश आले. ऑस्ट्रेलियन संघाने ५ बाद २३३ धावा करून आपला दुसरा डाव घोषित केला. पहिल्या डावाच्या आधारे कांगारूंकडे २१६ धावांची आघाडी होती. अशा स्थितीत दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची एकूण आघाडी ४४९ धावांची झाली आणि पाकिस्तानला ४५० धावांचे लक्ष्य मिळाले. मात्र, तगड्या आव्हानाचा पाठलाग करताना पाकिस्तानचा संघ प्रत्युत्तरात ८९ धावांवर गारद झाला.
ऑस्ट्रेलियाचा दुसरा डाव
दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाची सुरुवात खराब झाली. पहिल्या डावात शतक झळकावणाऱ्या डेव्हिड वॉर्नरला या डावात खातेही उघडता आले नाही. मार्नस लाबूशेन दोन धावा करून बाद झाला. या दोघांना खुर्रम शहजादने पॅव्हेलियनमध्ये पाठवले. यानंतर उस्मान ख्वाजाने स्टीव्ह स्मिथसोबत तिसऱ्या विकेटसाठी ८२ धावांची भागीदारी केली. स्मिथ ४५ धावा करून शेहजादचा बळी ठरला. ट्रॅव्हिस हेड १४ धावा करून आमिर जमालचा बळी ठरला. यानंतर उस्मान ख्वाजा आणि मिचेल मार्श यांनी पाचव्या बळीसाठी १०७ धावांची भागीदारी नोंदवली. कमिन्स ख्वाजाच्या शतकाची वाट पाहत होता पण ९० धावांवर तो बाद होताच डाव घोषित करण्यात आला. मार्श ६३ धावा करून नाबाद राहिला. शहजादने तीन बळी घेतले. त्याचवेळी आमिर जमाल आणि शाहीन आफ्रिदी यांना प्रत्येकी १-१ बळी घेण्यात यश आले.
पाकिस्तानचा दुसरा डाव
४५० धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना शेजाऱ्यांना घाम फुटला. पाकिस्तानी संघ केवळ ८९ धावांत आटोपला. दुसऱ्या डावात ऑस्ट्रेलियाकडून मिचेल स्टार्क आणि जोश हेझलवुड यांनी प्रत्येकी ३-३ बळी घेतले. तर, पॅट कमिन्स (१) आणि नॅथन लायन (२) यांनी ऑस्ट्रेलियाच्या विजयावर शिक्कामोर्तब केला.
पाकिस्तानचा पहिला डाव
पहिल्या डावात पाकिस्तानला २७१ धावांत गुंडाळल्यानंतरही ऑस्ट्रेलियाने पाकिस्तानला फॉलोऑन होऊ दिले नाही. तिसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या डावात २ गडी गमावून ८४ धावा केल्या होत्या. त्यानंतर स्मिथ आणि ख्वाजा नाबाद परतले. पाकिस्तानचा संघ पहिल्या डावात ऑस्ट्रेलियाच्या २१६ धावांनी मागे राहिला. पाकिस्तानने तिसऱ्या दिवसाची सुरुवात दोन बाद १३२ धावांवर केली. नॅथन लायन (३), पॅट कमिन्स (२), मिचेल स्टार्क (२) आणि जोश हेझुलवड, मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांनी प्रत्येकी १-१ बळी घेऊन पाहुण्या संघाचा करेक्ट कार्यक्रम केला. पाकिस्तानकडून पहिल्या डावात इमाम-उल-हकने सर्वाधिक (६२) धावा केल्या.
ऑस्ट्रेलियाचा पहिला डाव
नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करताना डेव्हिड वॉर्नरच्या शतकी खेळीमुळे ऑस्ट्रेलियन संघ मजबूत स्थितीत पोहोचला. वॉर्नरने १६४ धावांची खेळी केली, ज्यात १६ चौकार आणि चार षटकारांचा समावेश होता. मिचेल मार्शने १०७ चेंडूंत १५ चौकार आणि १ षटकाराच्या मदतीने ९० धावा कुटल्या. याशिवाय उस्मान ख्वाजाने ४१ धावा, मार्नस लाबूशेनने १६ धावा, स्टीव्ह स्मिथने ३१ आणि ट्रॅव्हिस हेडने ४० धावा केल्या.
Web Title: Australia vs Pakistan 1st Test Australia win by 360 runs Australia's spinner Nathan Lyon claims 500th wicket
Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.